आषाढी वारीला अधिक मासाचा 'ब्रेक'; पालख्या महिनाभर उशिरा मार्गस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 10:08 IST2026-03-31T10:04:17+5:302026-03-31T10:08:52+5:30

संत मुक्ताई २४ जून, संत निवृत्तिनाथ २९ जून, संत तुकाराम व संत एकनाथ ७ जुलै, संत ज्ञानेश्वर ८ जुलैला, तर संत सोपानदेव १२ जुलैला प्रस्थान ठेवणार

More fish 'break' during Ashadhi Wari; Palkhya delayed by a month | आषाढी वारीला अधिक मासाचा 'ब्रेक'; पालख्या महिनाभर उशिरा मार्गस्थ

आषाढी वारीला अधिक मासाचा 'ब्रेक'; पालख्या महिनाभर उशिरा मार्गस्थ

नीरा : अधिकमासामुळे यंदाच्या आषाढी वारीच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला असून, राज्यातील संतांच्या पालख्या नेहमीपेक्षा सुमारे एक महिना उशिराने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांच्या उत्साहात मात्र कोणतीही कमी नसली तरी वारीचे वेळापत्रक पुढे सरकल्याचे चित्र दिसत आहे.

यंदा ज्येष्ठ महिन्यात अधिकमास आल्यामुळे आषाढी वारी एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे. १७ मेपासून अधिकमासाला सुरुवात झाली असून, तो १५ जूनपर्यंत राहाणार आहे. त्यामुळे दरवर्षी मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निघणारे राज्यातील संतांचे पालखी सोहळे यंदा २४ जूनपासून आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत.

श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. संतांच्या अभंगातूनही पंढरपूरचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पालखी सोहळ्याची परंपरा सन १६८५ पासून सुरू झाली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र संत नारायण महाराज यांनी ही परंपरा सुरू केली. ज्येष्ठ वद्य सप्तमीला संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून त्या श्री क्षेत्र आळंदीत आणल्या जात आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले जात असे. या दोन्ही पादुकांच्या संगमातूनच ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या जयघोषाचा उगम झाल्याचे सांगितले जाते.

यंदाच्या वारीत राज्यातील मानाच्या सात पालख्यांचे प्रस्थान क्रमाक्रमाने होणार आहे. संत मुक्ताईंची पालखी श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथून बुधवारी (दि. २४ जून) रोजी निघणार आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तिनाथ महाराज यांची पालखी सोमवार, दि. २९ जून रोजी प्रस्थान ठेवणार आहे. मंगळवार, दि. ७ जुलै रोजी देहूहून जगद्गुरु संत तुकाराम महाराज तसेच श्री क्षेत्र पैठणहून संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. बुधवार, दि. ८ जुलै रोजी श्री क्षेत्र आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज, तर रविवार, दि. १२ जुलै रोजी श्री क्षेत्र सासवडहून संत सोपानदेव महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे निघणार आहेत.

दरम्यान, आषाढ शुद्ध दशमी म्हणजेच शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी संत नामदेव महाराज पंढरपूरहून सर्व संतांना भेटण्यासाठी इसबावी येथील विसावा पादुका येथे येणार आहेत. त्यानंतर शनिवार, दि. २५ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पंढरपूरमध्ये मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे.

Web Title : आषाढ़ी वारी में अधिक मास का 'ब्रेक'; पालकी एक महीने देरी से रवाना

Web Summary : अधिक मास के कारण आषाढ़ी वारी एक महीने देरी से शुरू होगी। पालकी 24 जून से रवाना होंगी, और मुख्य उत्सव 25 जुलाई को पंढरपुर में होगा। भक्तों का उत्साह बना रहेगा।

Web Title : Adhik Maas 'Break' to Ashadhi Wari; Processions Delayed by Month

Web Summary : Due to Adhik Maas, Ashadhi Wari processions are delayed by a month. Palakhis will depart from June 24th, with main celebrations on July 25th in Pandharpur. Devotees' enthusiasm remains undeterred.