Monkey Hill, Nagnath tunnel work in the new year | मंकी हिल, नागनाथ बोगद्याचे काम नव्या वर्षात
मंकी हिल, नागनाथ बोगद्याचे काम नव्या वर्षात

ठळक मुद्दे पाऊस खूप काळ सुरू राहिल्यामुळे कामात अनेक अडथळेयेत्या १५ जानेवारी पर्यंत काम पूर्ण होवून या मार्गावरून सर्व रेल्वे गाड्या धावणार दिवस-रात्र काम सुरू ; धोकादायक डोंगरासाठी स्वतंत्र यंत्रणा 

तेजस टवलारकर - 
लोणावळा : मागील काही महिन्यांमध्ये सातत्याने झालेल्या पावसामुळे मंकी हिल ते नागनाथ बोगदा हा रेल्वे मार्ग खचला होता. त्यामुळे या मार्गावरून पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्यांसह अन्य काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. सध्या मात्र मुंबईला जाणाऱ्या खचलेल्या रेल्वेमार्गाचे काम हे वेगाने सुरू असून येत्या १५ जानेवारी पर्यंत काम पूर्ण होवून या मार्गावरून सर्व रेल्वे गाड्या धावणार आहेत. ही माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
सुतार म्हणाले, दुरुस्ती कामामुळे ३ ऑक्टोबरपासून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे  मार्ग बदलण्यात आले आहेत. तर काही गाड्या पुण्यापर्यंत धावत आहेत. सद्यस्थितीत खचलेल्या मार्गाचे  ६०  टक्के काम पूर्ण झाले आहे. ४० टक्के काम लवकरच पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जानेवारीच्या मध्यापर्यंत हा मार्ग सुरू करण्याचे ध्येय रेल्वे प्रशासनाचे आहे. मंकी हिल ते नागनाथ बोगद्याच्या मध्यभागी एक पूल आहे. पुलाच्या शेजारचा रेल्वेमार्ग खचला होता. खचलेल्या भागात ४३  मीटरचा पूल उभारण्यात येत आहे. हा पूल जुन्या पुलाला जोडला जाणार आहे. सुमारे दीड महिन्यांपासून पूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी सुमारे १०  कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे काम २४ तास सुरूच आहे. एका पाळीत ६० कामगार काम करीत आहेत. 
......
दुरुस्ती कामाठिकाणी एका बाजुला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी आहे. त्यामुळे वेगाने काम पूर्ण करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच पाऊस खूप काळ सुरू राहिल्यामुळे कामात अनेक अडथळे येत होते. 
च्तसेच लोणावळा येथून सर्व साहित्य विशेष गाडीतून घेऊन यावे लागत आहे. गाडी विशेष ठिकाणी थांबवावी लागत आहे. तेथून पुन्हा कामगारांच्या मदतीने साहित्य पुढे घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे दुरुस्ती कामाला विलंब लागत असल्याचेही सुतार यांनी स्पष्ट केले.
.....
दिवस-रात्र काम सुरू 
दुरुस्तीचे काम रात्रंदिवस सुरू आहे. रात्रीसाठी हॅलोजन बल्बची व्यवस्था करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास मार्ग खचून जाऊ 
नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानचा वापर केला जात आहे. 
या कामासाठी कोकण विभागाच्या तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचाºयांची मदत घेतली जात आहे. 
......
‘गॅलव्हनाइज स्टील’चे आवरण लावले पोल 
बोरघाट परिसर हा डोंगराळ असल्याने येथे माकडांची संख्या मोठी आहे. ही माकडे रेल्वे लाईनवरील पोलवरून ओव्हरहेड वायरवर चढतात. यामुळे अनेकदा ओढाताण होऊन वायर तुटण्याच्या घटना घडतात. परिणामी रेल्वे गाड्यांचा विद्युत प्रवाह खंडित होऊन गाड्या थांबवाव्या लागतात. 
......
दरम्यान, यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने घाट परिसरातील खंडाळा स्टेशन ते नागनाथ स्टेशन दरम्यान हे ट्रॅप लावण्यात आले आहेत. माकडांनी पोलवर चढू नये, यासाठी पोलच्या मध्यभागी ‘गॅलव्हनाईज स्टील’चे आवरण लावले आहे. यामुळे माकडे पोलवर चढू शकत नाहीत. माकडांनी वर चढण्याचा प्रयत्न केल्यास ते घसरून खाली पडतात.
.......
धोकादायक डोंगरासाठी स्वतंत्र यंत्रणा 
अतिपावसामुळे बऱ्याच ठिकाणी डोंगर पोकळ झाला आहे. पोकळ झालेल्या धोकादायक डोंगराची स्वतंत्र संघाकडून पहाणी केली जात आहे. पोकळ झालेल्या दगडाला खूण करून नंतर पोकळ झालेले धोकादायक दगड पाडले जात आहेत. मंकी हिल परिसरामध्ये सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाºया कॅच स्लाइडिंगचे काम पूर्ण झाले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कॅच स्लाईडिंग प्रभावी उपाययोजना ठरणार आहे. 

Web Title: Monkey Hill, Nagnath tunnel work in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.