'आगाऊ पैसे देण्यात आले होते', नाट्यनिर्मात्याची फसवणूक प्रकरणात दोषमुक्त करण्याची जरांगेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:48 IST2025-11-01T10:47:18+5:302025-11-01T10:48:43+5:30
नाटकांचे बुकिंग करण्यापूर्वी तक्रारदारांना पाच लाख रुपये आगाऊ देण्यात आले असून त्यांना गुन्ह्यातून वगळावे असा युक्तिवाद जरांगे यांच्या वकिलांनी केला

'आगाऊ पैसे देण्यात आले होते', नाट्यनिर्मात्याची फसवणूक प्रकरणात दोषमुक्त करण्याची जरांगेंची मागणी
पुणे : आपण नाट्यनिर्मात्याला आगाऊ पैसे दिले असून, कोणतीही फसवणूक केली नसल्याचा युक्तिवाद करीत याबाबत दाखल गुन्ह्याबाबतच्या खटल्यातून दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात पुणेन्यायालयात शुक्रवारी (दि.३१) झालेल्या सुनावणीला ते हजर राहिले. याप्रकरणी १८ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
नाटकांचे प्रयोग आयोजित करून नाट्यनिर्मात्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल आहे. याबाबत, धनंजय घोरपडे (रा. वारजे) यांनी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने जरांगे यांच्यासह दोन आरोपींविरोधात न्यायालयाने यापूर्वी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. त्यानंतर जरांगे यांनी न्यायालयात हजर होत वॉरंट रद्द करण्याची प्रक्रिया करून घेतली होती. आता या खटल्यातून दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज जरांगे यांनी केला आहे.
त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी.आर. डोरनालपल्ले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आजारपणामुळे जरांगे मागील काही तारखांना उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ते शुक्रवारी दुपारी सुनावणीला हजर झाले. त्यांच्या वतीने ॲड. हर्षद निंबाळकर व ॲड. शिवम निंबाळकर यांनी बाजू मांडली. याप्रकरणी जरांगे यांच्याविरोधात आरोप निश्चिती करण्यासाठी पुरेसे पुरावे नसून, त्यांचा फसवणूक करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. नाटकांचे बुकिंग करण्यापूर्वी तक्रारदारांना पाच लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना गुन्ह्यातून वगळावे, असा युक्तिवाद निंबाळकर यांनी केला. दरम्यान, मूळ तक्रारदारांच्या वतीने ॲड. खंडेराव टाचले, ॲड. आकाश बिराजदार आणि सरकारी वकील दिगंबर खोपडे पुढील तारखेला युक्तिवाद करणार आहेत.