पिंपरी : अन्नधान्य वितरण विभागाच्या ‘फ’ झोनचे भोसरी येथील परिमंडळ अधिकारी गजानन अशोकराव देशमुख (वय ३६, रा. धनकवडी, पुणे) याला १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. भोसरी येथे अन्न वितरण कार्यालयात गुरुवारी (दि. ११ डिसेंबर) दुपारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. १४ नागरिकांच्या नवीन रेशनकार्ड मंजुरीसाठी त्याने लाचेची मागणी केली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्य करत असलेल्या २५ वर्षीय तरुणाने याबाबत बुधवारी (दि. १० डिसेंबर) एसीबीकडे तक्रार केली. तक्रारदार हे अपंग असून समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या ओळखीतील १४ जणांची नवीन रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण करून ‘एन’ नंबर प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार हे अन्न नागरी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक गजानन देशमुख याला भेटले. तेव्हा त्याने प्रत्येक रेशनकार्डसाठी ९०० रुपयांप्रमाणे १२ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम शासकीय फी व्यतिरिक्त असल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली.
एसीबीने केलेल्या पडताळणीदरम्यान देशमुख याने १४ रेशनकार्ड मंजूर करून त्यावर सही शिक्का देण्यासाठी सुरुवातीला १९ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर १६ हजार रुपयांवर व्यवहार निश्चित केल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार गुरुवारी दुपारी भोसरी येथील अन्नधान्य वितरण कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १६ हजार रुपये लाच स्वीकारताना गजानन देशमुख याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व आसावरी शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Summary : A food distribution officer in Bhosari was arrested for accepting a ₹16,000 bribe to approve ration cards. ACB laid a trap after a complaint. He demanded money for approving 14 new ration cards.
Web Summary : भोसरी में खाद्य वितरण अधिकारी राशन कार्ड मंजूर करने के लिए ₹16,000 की रिश्वत लेते गिरफ्तार। शिकायत के बाद एसीबी ने जाल बिछाया। उसने 14 नए राशन कार्ड मंजूर करने के लिए पैसे मांगे थे।