पुणे: भारतीय रंगभूमीमध्ये पैसा नाही, अशी प्रत्येक कलाकाराची रड असते; पण रंगभूमीवर कधी पैसे नव्हते आणि नसणार आहेत. आधीही पैसे नव्हतेच, आताही नाही आणि भविष्यातही पैसे नसणारच आहेत. नाटक हे पैशांसोबत कधीच होऊ शकत नाही, पैसा आला आणि रंगभूमी कोलमडली. पैशाने रंगभूमीची ऐशी-तैशी केली. त्यामुळे रंगभूमीला पैसा मिळत नाही, ही रड कायम राहणार आहे. आज विद्यार्थ्यांच्या रंगमंचावरील कलाकृती पाहिल्यानंतर वाटते की पैसा नाही हेच बरे आहे. किमान अशा कलाकृती तरी पाहायला मिळत आहे, असे मत संगीत निर्देशक, गायक, गीतकार, पटकथा लेखक, अभिनेता पीयूष मिश्रा यांनी व्यक्त केले.
सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट, स्वप्नभूमी आयोजित एचसीएल फाउंडेशन आणि पुनीत बालन ग्रुप प्रायोजित फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीयूष मिश्रा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मिश्रा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला फिरोदिया समूहाचे अजिंक्य फिरोदिया, एचसीएल फाउंडेशनच्या डॉ. निधी पुंधीर, स्पर्धेचे संयोजक सूर्यकांत कुलकर्णी उपस्थित होते.
अभिनेता ओम भूतकर आणि गायिका प्रियांका बर्वे यांचा कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी गायिका बर्वे व अभिनेता भूतकर यांनी मनोगत व्यक्त करीत या करंडक मुले आम्ही घडलो, असे सांगत या कार्यक्रमाचे कौतुक केले. लेखन, दिग्दर्शन, अभिनय या मूलभूत नाट्य पैलूंबरोबरच संगीत, वादन, नृत्य तसेच चित्रकला, शिल्पकला अशा बहुविध कलाप्रकारांची एकत्र गुंफण करून एक सूत्रबद्ध सादरीकरण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांद्वारे सादर केले.या वेळी सूर्यकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अजिंक्य फिरोदिया, डॉ. निधी पुंधीर यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, पारितोषिक कार्यक्रमात धरतीची आम्ही लेकरं आणि दास्तान-ए-जहान ही विजेत्या संघांची सादरीकरण केले. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पीयूष मिश्रा यांनी जिंकली प्रेक्षकांची मने
मैं पीयूष मिश्रा अशी ओळख मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना करून दिली अन् आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहून विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. मिश्रा यांनी विद्यार्थ्यांच्या फर्माईशनुसार इक बगल में चाँद होगा, इक बगल में रोटियाँ अन् आरंभ है प्रचंड... ही गाणी सादर केली अन् त्यांच्या गायकीला विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आरंभ है प्रचंड या गायनाने पीयूष मिश्रा यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला.