आठ महिन्यांपासून चकवा देणारा मोक्कातील फरारी चिपळूणमधून अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2023 17:26 IST2023-06-07T17:26:39+5:302023-06-07T17:26:53+5:30
सुरज संतोष ढवळे (वय: १९, रा. देशमुख प्लाझा शेजारी, साईनगर, हिंगणे-खुर्द, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव

आठ महिन्यांपासून चकवा देणारा मोक्कातील फरारी चिपळूणमधून अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी
धायरी : तब्बल आठ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत मोक्कातील फरारी आरोपीला रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण येथून सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. सुरज संतोष ढवळे (वय: १९, रा. देशमुख प्लाझा शेजारी, साईनगर, हिंगणे-खुर्द, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज ढवळे आणि त्याच्या साथीदारांविरूध्द सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहेत. त्या गुन्हयातील आरोपींविरूध्द मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. ढवळेच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, ढवळे हा गेल्या आठ महिन्यापासुन फरार होता.
ढवळे हा रत्नागिरी जिल्हयातील चिपळुन येथे असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांना मिळाली होती. त्याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना कळविले होते. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिस पथकाने चिपळुन येथे जाऊन स्थानिक पोलिसांची मदत घेवून आरोपी ढवळेला अटक केली आहे. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे करीत आहेत. पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहाय्यक उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलिस अंमलदार संजय शिंदे, विकास पांडुळे, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, अमोल पाटील, अमित बोडरे आणि अविनाश कोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.