"मोदींनी जगाला लसींचा पुरवठा केला, भागवत धर्माचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 15:52 IST2022-06-14T15:50:33+5:302022-06-14T15:52:49+5:30
आपल्या संतांनी दिलेली शिकवणच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आचरणात दिसून येते, असे म्हणत फडणवीसांनी मोदींनीही सेवाधर्म जपल्याचे सांगितले.

"मोदींनी जगाला लसींचा पुरवठा केला, भागवत धर्माचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला"
पुणे - श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यात आहेत, याचा आनंद आहे. आपल्या संतांनी दिलेली शिकवणच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आचरणात दिसून येते, असे म्हणत फडणवीसांनी मोदींनीही सेवाधर्म जपल्याचे सांगितले.
जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले !
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा !!
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओवींचं प्रत्यक्षात अनुकरण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. जे का रंजले, गांजले त्यांचे सेवक बनून काम करण्याची शिकवण आपणास तुकाराम महाराजांनी दिली. तुकाराम महाराजांची हिच शिकवण नरेंद्र मोदी प्रधान सेवक बनून गरिबांच्या कल्यासाठी काम करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत. कारण, वारकऱ्यांमध्ये कोणी मोठं नसतं, कोणी छोटं नसतं. वारकऱ्यांमध्ये सर्वच सेवक असतात.
माऊलींनी जो अखिल विश्वाचा विचार आपल्याला दिला, त्याच मार्गावर आज देशाचे नेतृत्त्व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी @narendramodi करीत आहेत.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) June 14, 2022
कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाला मदत करण्याचे काम मोदीजींच्या नेतृत्त्वात झाले : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
संपूर्ण जगासाठी ज्ञानेश्वरांनी पसायदान सांगितलं. आता विश्वात्मके देवे... संपूर्ण विश्वच आपलं आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींनी कोरोना कालवधीत संपूर्ण जग आपलं मानून जगाला लस पोहोचविण्याचं काम केलं. भागवत धर्माचा विचार सामान्य माणसांपर्यंत मोदींनी पोहोचवला, असे म्हणत फडणवीस यांनी मोदींच्या कोरोना कालावधीतील कार्याची जोड संतांच्या शिकवणीला दिली.
भारत ही संतांची भूमी - मोदी
पंतप्रधान मोदींनी उपस्थित वारकरी संप्रदायास संबोधित केले. यावेळी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी मोदींनी गायली. भारत हा संतांची भूमी असलेला देश आहे, संतांची शिकवणच आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहे. संतांचे अभंग हे सातत्याने आपल्यास प्रेरणा देतात, असे मोदींनी म्हटले.