मनसेचा महाविकास आघाडीतील समावेश, काँग्रेससाठी राजकीय गोची करणारा ठरणार
By राजू इनामदार | Updated: August 8, 2025 17:11 IST2025-08-08T17:10:36+5:302025-08-08T17:11:03+5:30
विचारधारेचा प्रश्न : सांगताही येत नाही, सहनही होत नाही

मनसेचा महाविकास आघाडीतील समावेश, काँग्रेससाठी राजकीय गोची करणारा ठरणार
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाविकास आघाडीतील समावेश काँग्रेससाठी राजकीय गोची करणारा ठरणार आहे. त्यामुळेच या विषयावर काँग्रेसकडून अद्याप कसलेही भाष्य करण्यात आलेले नाही व वरिष्ठांनी अन्य कोणाला बोलूही दिलेले नाही. आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मात्र या समावेशाला जवळपास हिरवा कंदील दाखवला आहे.
राज्य सरकारने हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्तीची केल्यानंतर त्याच्या विरोधात मनसेने पहिला आवाज उठवला. त्यापाठोपाठ महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानेही हिंदीसक्तीचा विरोध केला. त्यानंतरच तब्बल २० वर्षे दुरावलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने सक्तीसंबधीचे दोन्ही अध्यादेश रद्द केल्यानंतर मनसे-शिवसेना यांनी एकत्रितपणे मराठी विजय मेळावा घेतला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. काँग्रेसने मात्र या मेळाव्यापासून अंतर राखणेच पसंत केले.
काँग्रेसमधील काही ज्येष्ठांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रादेशिक आहेत. मनसेही प्रादेशिकच आहे. काँग्रेस मात्र राष्ट्रीय पक्ष आहे. स्थानिक राजकीय फायदा लक्षात घेऊन काँग्रेसने काही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम देशात होऊ शकतो. बिहार विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. तिथे काँग्रेसला चांगले यश मिळणे अपेक्षित आहे. असे असताना मुंबईमधील बिहारी नागरिकांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या, प्रसंगी त्यांना धाकदपटशा करणाऱ्या मनसेबरोबर राजकीय संधान बांधणे काँग्रेसला महागात पडू शकते. त्याचा बिहारमधील मतांवर थेट परिणाम होईलच, शिवाय पक्षाच्या राष्ट्रीय राजकीय प्रतिमेसाठीही ते हानिकारक ठरू शकते, असे पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.
त्यामुळेच पक्षाने या विषयावर मौन बाळगले आहे. महाविकास आघाडीत राज्यस्तरावर काँग्रेस हा प्रमुख घटक पक्ष आहे. त्याला डावलून काही निर्णय घेणे आघाडीच्या एकीकरणाच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते. त्यावर तोडगा म्हणून मनसे-शिवसेना युती व फक्त शिवसेना महाविकास आघाडीत अशी काही राजकीय तडजोड करण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. राज्यात काँग्रेससाठी चांगले वातावरण नाही. बहुसंख्य मोठ्या शहरांमध्ये काँग्रेसची वाताहत झाली आहे. मनसेच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवल्या तर पक्षाचे पानिपत होऊ शकते, अशी राजकीय स्थिती असल्याचे स्थानिक नेत्यांनी पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणले आहे.
त्यामुळेच काँग्रेसची सध्याची स्थिती सांगताही येत नाही व सहनही होत नाही, अशी झाली आहे. त्यातूनच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना या युतीवर सध्या काहीही बोलायचे नाही, अशी तंबी दिली असल्याची माहिती काही नेत्यांनी दिली. मनसेपासून ठरावीक अंतरावर राहायचे, असे त्यांना बजावले असल्याचे समजते. केंद्रीय नेतेच याबाबतीत काय तो निर्णय घेतील व राज्याला कळवतील, तोपर्यंत मनसेचा विषय बंदच ठेवायचा, असे त्यांना सांगण्यात आले आहे.