महापालिकेसाठी मनसे शहर शाखेच्या बैठकांना सुरुवात
By राजू इनामदार | Updated: December 13, 2024 17:30 IST2024-12-13T17:29:58+5:302024-12-13T17:30:56+5:30
राज ठाकरेंचा नेत्यांना आदेश : सध्या स्वतंत्रपणे कामाचे धोरण

महापालिकेसाठी मनसे शहर शाखेच्या बैठकांना सुरुवात
पुणे : विधानसभेत पानिपत झाल्यानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांची पुण्यात बैठक घेऊन त्यांना दिलासा दिला. त्याचवेळी त्यांनी पुण्यातील नेत्यांना महापालिकेसाठी बैठकांना सुरुवात करण्याचा आदेश दिला. त्यानुसार बुधवारी (दि. ११) मनसेच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून, त्यात प्रभागनिहाय माहिती घेत महापालिकेच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मनसेचे नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी ही बैठक घेतली. पुण्यातील सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच कार्यकर्त्यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. वागसकर, बाबर यांनी त्यांच्याकडून महापालिका प्रभागनिहाय माहिती घेतली. विधानसभेच्या निवडणुकीत खडकवासला, हडपसर व कोथरूड या तीन विधानसभा मतदारसंघांत पराभव झाला असला तरी तिथे मनसेला चांगली मते आहेत. या मतदारसंघांमध्ये येणाऱ्या महापालिकेच्या प्रभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विधानसभेचे उमेदवार असलेल्यांना तिथे संपर्क अभियान सुरू करण्यास सांगण्यात आले.
खुद्द राज यांनीच ‘खचून जाऊ नका, आपली धोरणे, आपले विचार बरोबर आहेत. आज कदाचित जनता बरोबर नसेल; मात्र उद्या ती आपल्याबरोबर येईलच’ असा विश्वास आपल्या पराभूत उमेदवारांना स्वत: त्यांची एकत्रित बैठक घेऊन दिला. त्याचवेळी त्यांनी पुण्यातील नेत्यांना महापालिका निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारीला लागा, असे सांगितले असल्याची माहिती मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली. त्याप्रमाणे बुधवारी ही बैठक घेण्यात आली. राज यांनी दिलेल्या सूचनांची माहिती वागसकर यांनी या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली. युतीबरोबर राहायचे की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय राज घेतील. मात्र, तोपर्यंत स्वतंत्रपणे काम करत राहण्याच्या सूचना वागसकर व बाबर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
मनसेचे २०१४ मध्ये महापालिका सभागृहात २८ नगरसेवक होते. त्यानंतरच्या पंचवार्षिकमध्ये (२०१७ ते २०२२) ही संख्या थेट २ वर आली. त्यातलेही एक नगरसेवक, वसंत मोरे जे मनसेचे फायर ब्रँड म्हणून ओळखले जात होते, ते मनसे सोडून बाहेर पडले. दुसरे नगरसेवक साईनाथ बाबर आता शहराध्यक्ष आहेत. ते हडपसर विधानसभेचे उमेदवार होते. त्यांना तिथे ३३ हजारांपेक्षा जास्त मते पडली आहेत. मनसेचेच दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे खडकवासला विधानसभा मतदारसंघात उमेदवार होते. त्यांना ४२ हजार मते मिळाली. मनसेच्या वकील सेनेचे अध्यक्ष असलेले किशोर शिंदे कोथरूड विधानसभेत उमेदवार होते. त्यांना १८ हजार मते मिळाली.
या तीनही मतदारसंघांत बारकाईने लक्ष देण्याचा, तिथे पक्षाचे काम वाढवण्याचा, त्यासाठी लोकोपयोगी तसेच सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दुसरी बैठक लवकरच घेऊन त्यात या कामांचे नियोजन करण्याचे ठरले.
राज ठाकरे यांनीच याबाबतचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आम्ही आता प्राथमिक बैठक घेतली आहे. लवकरच संपूर्ण शहराचे नियोजन करण्यात येईल. विधानसभेप्रमाणे स्वतंत्र लढायचे की कोणाबरोबर जायचे याचा निर्णय राज ठाकरे घेतील. त्याप्रमाणे आम्ही काम करू, मात्र तत्पूर्वी आम्ही संपूर्ण शहरात सर्व जागा लढवण्याच्या दृष्टीने नियोजन करत आहोत. -बाबू वागसकर, नेते, मनसे