विधानसभेची परतफेड ! पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 22:02 IST2020-11-07T20:43:00+5:302020-11-07T22:02:49+5:30
विधानसभा निवडणुकांवेळी मनसेने कसबा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु, ऐनवेळी शहरप्रमुख अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

विधानसभेची परतफेड ! पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महिला अध्यक्षा रुपाली पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या अगोदर मनसेने आपला महिला उमेदवार मैदानात उतरून त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
विधानसभा निवडणुकांवेळी मनसेने कसबा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु ऐनवेळी शहरप्रमुख अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावरून कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर्गत नाराजी उमटली होती. त्यानंतर, पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन पदवीधर मतदार संघात लढण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली होती. सर्वच राजकीय पक्षांकडून पदवीधर मतदार नोंदणी जोरदार सुरू करण्यात आली आहे. मनसे या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत नव्हती. परंतु, शनिवारी पाटील यांची उमेदवारी घोषित करून मनसेने आव्हान निर्माण केले आहे. पदवीधरसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. पुणे विभागाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून उर्वरित विभागांची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे.
------
रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्तीचा सन्मान
मी मागील वर्षभरापासून पश्चिम महाराष्ट्रात काम करीत आहे. जनतेच्या प्रश्नावर आक्रमकपणे काम केल्यामुळे उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी दिल्याबद्दल मी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आभारी आहे.
- ऍड. रुपाली पाटील, उमेदवार, मनसे