पुणे : वार्षिक बाजारमूल्य दर अर्थात रेडीरेकनर दर ठरविताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अंतर्भाव केला जातो. मात्र, जिल्ह्याच्या दरांबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचनांसाठी आयोजित बैठकीकडे केवळ एक आमदार वगळता अन्य सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी मात्र हे दर वाढवू नयेत, अशी मागणी यावेळी केली.
रेडीरेकनर दर दरवर्षी ठरविले जातात. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हे दर बदलण्यात आलेले नाहीत. यंदा रेडीरेकनर दर वाढविण्यात येणार अशी चर्चा आहे. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली जाते. बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांना आमंत्रित करण्यात येते. लोकप्रतिनिधी रेडीरेकनरबाबत सूचना करतात. या सूचना राज्य सरकारकडे पाठविण्यात येतात. राज्य सरकार त्यावर चर्चा करून त्याचा अंतर्भाव करण्याबाबत निर्णय घेते. त्यानंतर रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात.
याबाबत मंगळवारी (दि. २८) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजित करण्यात आली होते. जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे तसेच त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते. लोकप्रतिनिधींमधून मात्र, केवळ वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे हे एकमेव आमदार उपस्थित होते. नवीन वर्षात रेडीरेकनर दर वाढवायचे किंवा कमी करायचे याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना आल्याच नाहीत, तर पठारे यांनी यंदा महागाई वाढलेली असल्याने रेडीरेकनर दर वाढवू नयेत, अशी सूचना केली. अन्य लोकप्रतिनिधींना सामान्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या विषयाबाबत उदासीनता असल्याचे दिसून आले.