Jayant Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी एका व्यासपीठावर माझं काही खरं नाही असं विधान केलं होतं. या विधानानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील नाराज आहेत असं म्हणाले, यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, आज जयंत पाटील यांनी बारामती येथे खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर
मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवसापूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये बोलताना जयंत पाटील यांनी 'माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही',असं मोठं विधान केलं होतं. या विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. तर दुसरीकडे आज शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बारामती येथे खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
यावेळी जयंत पाटील आणि खासदार शरद पवार यांच्या बराच वेळ चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटीलांची भेट घेतली होती.
यावेळी जयंत पाटील यांनी बारामतीमध्ये खासदार शरद पवार यांच्यासोबत कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. उसाच्या शेतीचीही पाहणी केली.
'...तरीही जयंत पाटील हवेहवेसे वाटत आहेत'
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, जयंत पाटील यांच्यासोबत तासभर चर्चा झाली. राज्याच्या दौऱ्याबाबत नियोजन आम्ही केले. इतकी मोठी संघटना, इतका मोठा पक्ष असूनही त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटत आहेत. ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे, असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला लगावला.