आरोग्य विभागाकडून आकड्यांचा घोळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:25+5:302021-02-05T05:19:25+5:30
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाने घातलेला कोरोना रुग्णांच्या आकड्याचा घोळ अद्यापही सुरूच आहे. पालिका आणि राज्य शासनाचे आकडे अद्यापही ...

आरोग्य विभागाकडून आकड्यांचा घोळ सुरूच
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाने घातलेला कोरोना रुग्णांच्या आकड्याचा घोळ अद्यापही सुरूच आहे. पालिका आणि राज्य शासनाचे आकडे अद्यापही जुळत नसल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ अधिकारी हे आकडे जुळविण्यासाठी माथेफोड करीत असून खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये किती रुग्ण दाखल झाले, त्यातील किती बरे झाले, किती मृत्यू झाले याची आकडेवारीही पालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसल्याची कबुली खुद्द आरोग्यप्रमुखांनीच दिली आहे.
राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्च रोजी आढळून आला होता. त्यानंतर, अल्पावधीतच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. आजमितीस रुग्ण दुपटीचा ६५० चा असलेला वेग त्या काळात खूपच कमी होता. प्रशासकीय पातळीवर कोरोनाविषय उपाययोजना सुरू होत्या. डॉ. नायडू रुग्णालयासह पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचारांची सुविधा निर्माण करण्यात आली. परंतु, शासकीय आरोग्य व्यवस्था कमी पडू लागल्यावर खासगी रुग्णालयांच्या खाटांचे अधिग्रहण आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु करण्यात आले.
मागील सात आठ महिन्यात खासगी रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत. शहरात आजवर एकूण १ लाख ९२ हजार १८१ रुग्ण आढळून आले असून, यातील १ लाख ८५ हजार ६७८ रुग्ण बरे झाले आहेत. यातील जवळपास ८० टक्के रुग्ण हे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन घरी गेले आहेत.
परंतु, नेमके किती कोरोना रुग्ण खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल झाले, त्यातील किती जणांवर यशस्वी उपचार झाले, किती रुग्णांचा मृत्यू झाला याची सविस्तर आकडेवारीच आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. या सर्वांची एकत्रित आकडेवारी असली तरी खासगी रुग्णालये आणि शासकीय रुग्णालयनिहाय आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. या आकडेवारीबाबत अधिकारी गंभीर नसल्याचेही दिसून येत आहे.
====
दरम्यानच्या काळात पालिकेच्या कोरोना आकडेवारीमध्ये आणि शासनाच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून येत होती. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर, आकड्यांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर पुन्हा ही तफावत दिसू लागली असून आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे आकडे जुळविण्याची कसरत करीत आहेत.