कृषी आयुक्तांच्या नावाचा गैरवापर;हडपसर पोलिसांत तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:30 IST2025-07-16T10:30:32+5:302025-07-16T10:30:49+5:30
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या कंपनीला भेट दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कोकाटे यांचे नाव तसेच आयुक्तांच्या पदनामाचा गैरवापर करून राज्य सरकारची फसवणूक झाली आहे का, याचीही आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कृषी आयुक्तांच्या नावाचा गैरवापर;हडपसर पोलिसांत तक्रार दाखल
पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तांच्या पदनामाचा गैरवापर करण्याचा प्रकार पुण्यात आढळला असून कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी ही बाब गांभीर्याने घेत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व त्यांच्या पथकाने संबंधिताच्या कार्यालयाला भेट देऊन हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या कंपनीला भेट दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कोकाटे यांचे नाव तसेच आयुक्तांच्या पदनामाचा गैरवापर करून राज्य सरकारची फसवणूक झाली आहे का, याचीही आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर येथील समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या संचालकाने आपल्या नावापुढे कृषी आयुक्त लिहिलेला फलक कार्यालयाबाहेर लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्याच्या कृषी आयुक्तांच्या पदनामाचा आयुक्तांखेरीज वापर करणे कायद्याचा भंग आहे.
याबाबत तक्रार आल्यानंतर कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी कल्पना देण्यात आली. त्यानंतर मांढरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश काचोळे यांना दिले. त्यानुसार हडपसर येथील संबंधित कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी आणि पडताळणी करण्यात आली. पडताळणीत प्रशांत गवळी यांनी आपल्या नावासमोर कृषी आयुक्त म्हणून लावले असून त्याचा फलक कार्यालयाबाहेर लावल्याचे सिद्ध झाले. कृषी आयुक्त नावावर अतिशय बारीक अक्षरात सन्माननीय असे लिहिलेले आहे, असेही काचोळे यांनी सांगितले.
या पडताळणीत गवळी यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना आपल्या कार्यालयात बोलावल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी आयुक्त या पदनामाचा गैरवापर होत असल्याने याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत पोलिसांना मंत्री आणि आयुक्तांच्या नावाचा गैरवापर करून काही गैरकारभार होत आहे का, याचीही चौकशी करण्याचे सांगितले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पथकाच्या चौकशीत पदनामाचा गैरवापर केल्याचे आढळले आहे. त्यानुसार पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे. अधिक चौकशी करण्याचेही पोलिसांना सांगितले आहे. - सूरज मांढरे, कृषी आयुक्त