हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 18:13 IST2017-10-21T18:10:51+5:302017-10-21T18:13:45+5:30
पुणे-नगर महामार्गालगत असणार्या गणेश हार्डवेअर या दुकानाला भीषण आग लागून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास घडली.

हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
वाघोली : पुणे-नगर महामार्गालगत असणार्या गणेश हार्डवेअर या दुकानाला भीषण आग लागून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास घडली. ग्रामस्थ व अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने शेजारील इतर दुकानांची हानी टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर माहामार्गालगत शिवाजी पुतळा चौकाजवळ तांबे यांचे गणेश हार्डवेअर आणि सप्लायर्स नावाचे दुकान आहे. रात्री साडे बाराच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूने आग लागल्याचे बाजूच्या इमारतीत राहणार्या नागरिकांच्या लक्षात आले. आग मोठ्या स्वरूपात असल्याने दुकानाच्या वरील दहा ते बारा नागरिकांना सुरक्षित हलवून पाण्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न दुकान मालक व ग्रामस्थांनी केला. आगीचे प्रमाणे मोठे असल्याने आग आटोक्यात येणे शक्य झाले नाही. यानंतर अग्निशामक दलाला बोलाविण्यात आले. अग्निशामक दलाने काही वेळेतच आग विझविली. प्लाय, प्लॅस्टिक पाईप, वायर व अन्य वस्तुमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली. दुकानाचा पुढील काही भाग वगळता आतील सर्व माल जळून खाक झाला. दुकानाशेजारी प्लॅस्टिक वस्तुंचे, मेडिकल व कपडयाचे दुकान आहे. आग लागल्याचे वेळेत कळाले नसते तर त्याची झळ अन्य दुकानांनाही बसली असती.
आगीचे स्वरूप मोठे आणि जिन्याच्या शेजारीच दुकान असल्याने दुकानाच्यावर राहणार्या नागरिकांना खाली उतरविणे शक्य नव्हते. दुकान मालक व भाडेकरूंचा यामध्ये सहभाग होता. काही जणांना इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून खाली उतरविण्यात आले तर एक महिला मुलाला सोबत घेवून खाली उतरली. आग लागल्यानंतर लोणीकंद पोलीसही सुरक्षेखातर घटनास्थळी दाखल झाले होते.