लोणावळा, वरसगाव, पानशेत मार्गांवर सर्वाधिक पर्यटक; ‘पीएमपी’च्या पर्यटन बसला मोठा प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:35 IST2025-12-17T12:34:38+5:302025-12-17T12:35:37+5:30
पर्यटकांना एका दिवसात शहरातील जवळपास असणाऱ्या पर्यटन क्षेत्राला भेट देऊन आनंद घेण्याची संधी मिळत आहे.

लोणावळा, वरसगाव, पानशेत मार्गांवर सर्वाधिक पर्यटक; ‘पीएमपी’च्या पर्यटन बसला मोठा प्रतिसाद
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांसाठी पर्यटन बससेवा पुरविण्यात येत असून, या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या लोणावळा, बनेश्वर, देहूगाव पानशेत-वरसगावसह इतर १२ ठिकाणी पर्यटन सेवा सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात ७६४ प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेतला असून, यातून ३ लाख ८२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर नोव्हेंबर महिन्यात १,२८४ प्रवाशांनी प्रवास केला असून, यामधून ६ लाख ४२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
‘पीएमपी’कडून प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यटन बस सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना एका दिवसात शहरातील जवळपास असणाऱ्या पर्यटन क्षेत्राला भेट देऊन आनंद घेण्याची संधी मिळत आहे.
एका दिवसासाठी ‘पीएमपी’कडून ५०० रुपये तिकीट आकारले जाते. यातून दिवसभर निश्चित मार्गावरील ठिकाणांना भेट देण्यात येते. ही बस स्वारगेट, डेक्कन आणि पुणे स्टेशन येथून सोडली जाते. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये प्रवासी संख्या व उत्पन्नात जवळपास दुपटीने वाढ झालेली आहे. विशेषतः पानशेत-वरसगाव आणि लोणावळा या ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच इतर मार्गावरही पर्यटन बसला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
महिना--- प्रवासी संख्या --- उत्पन्न
ऑक्टोबर -- ७६४ -- ३ लाख ८२ हजार
नोव्हेंबर -- १,२८४ -- ६ लाख ४२ हजार
पर्यटकांना चांगली व दर्जेदार सेवा पीएमपी प्रशासनाकडून पुरविण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुढील काळात आणखी पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. - किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी