पुण्यात विवाहितेची ११व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 16:01 IST2022-04-26T15:59:06+5:302022-04-26T16:01:35+5:30
पतीसह निवृत्त प्राध्यापक सासऱ्यांना अटक

पुण्यात विवाहितेची ११व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या
पुणे : पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाह लावून दिला असतानाही लग्नात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही म्हणून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पतीसह निवृत्त प्राध्यापक असलेल्या सासऱ्याला अटक केली आहे.
दिव्या तरुण कानडे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तरुण मदन कानडे (वय ३०) आणि मदन कानडे (वय ६२, रा. नवरत्न एक्झोटिका सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सपना कानडे (वय ५७) आणि दीर अरुण कानडे (वय २६) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिचे वडील शामराव आनंदा बनसोडे (वय ५०, रा. धानेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्याचा विवाह १ जानेवारी २०२१ रोजी तरुण याच्याशी औरंगाबाद येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला होता. तरुण एमबीए झाला असून पुण्यातील एका नामवंत शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करीत आहे. वडील मदन कानडे औरंगाबादमधील महाविद्यालयात प्राध्यापक होते. गेल्या दिवाळीपासून दिव्याचा छळ सुरू झाला. लग्नात मानपान केले नाही, म्हणून तिच्याकडे पैशांची व सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली जाऊ लागली. बनसोडे यांना दोन मुली आहेत. त्यावरून दिव्या हिला तुझा बाप श्रीमंत आहे. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. त्याला कोठे मुलगा आहे. अर्धी मालमत्ता तुझ्या नावावर करायला सांग म्हणून छळ सुरू केला.
दिव्या हिचा मेसेज मिळाल्याने बनसोडे हे गुरुवारी स्वत: पुण्यात येऊन भेटले. त्यांनी तुमचे काय म्हणणे आहे, ते सांगा, असे विचारले. तेव्हा दोघांनीही आमची काही मागणी नाही, अशी सारवासारव केली. त्यानंतरही छळ सुरूच राहिल्याने कंटाळून दिव्या हिने सोमवारी सकाळी इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, निरीक्षक सावळाराम साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे अधिक तपास करीत आहेत.