Maratha Reservation : संसदेत १०२ वी घटना दुरुस्ती होत असताना संभाजीराजेंनी तोंड का उघडले नाही? बी.जी. कोळसे पाटलांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 15:06 IST2021-05-29T15:03:20+5:302021-05-29T15:06:16+5:30
खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यानंतर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Maratha Reservation : संसदेत १०२ वी घटना दुरुस्ती होत असताना संभाजीराजेंनी तोंड का उघडले नाही? बी.जी. कोळसे पाटलांचा हल्लाबोल
पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत ६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनाचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी देखील संभाजीराजेंच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी मात्र खासदार संभाजीराजेंच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.
खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यानंतर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच संसदेत सरकारने ज्यावेळी १०२ वी घटना दुरुस्ती केली त्यावेळी तिथे हजर असताना संभाजीराजे याांनी तोंड का उघडले नाही? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. आणि ते मिळायलाच पाहिजे. पण मराठा आरक्षणावरून सध्या फक्त राजकारण केले जात आहे. तसेच खासदार संभाजीराजेंनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याच्यावरून फक्त मराठ्यांच्या नावाने राजकारण करण्याचा हेतू दिसून येत आहे असा आरोपही कोळसे-पाटील यांनी केला आहे.
...नाहीतर ६ जूनपासून रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु.खासदार संभाजीराजे आक्रमक
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराज ६ जून रोजी छत्रपती झाले. आज मी घोषणा करतोय. ६ जूनपर्यंत आमच्या पाच मागण्या मान्य झाल्या नाहीतर ६ जूनपासून रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु. यावेळी आम्ही कोरोना बिरोना बघणार नाही", असा थेट इशाराच छत्रपती संभाजी राजेंनी दिला आहे. तसेच त्यांनी यावेळी सरकारसमोर पाच महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.त्या पूर्ण व्हायला हव्यात. आज मराठा समाज माझ्यामुळे शांत आहे", असेही संभाजी राजे म्हणाले आहे.
संभाजीराजेंच्या 'अल्टिमेटम' नंतर अजित पवारांचे मोठे संकेत.....
मराठा आरक्षण संदर्भात सगळं सुरळीत चाललेलं आहे. तुम्ही त्याला काही वेगळं वळण देऊ नका. संभाजी राजे यांनी ६ जून पर्यंतची मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी मुदत दिली आहे.पण या तारखेला अद्यापही ९ दिवस अवकाश आहे. यादरम्यान नक्कीच चांगला निर्णय घेता येईल. मात्र, मराठा आरक्षणावरून काहींना त्यात राजकारणच करायचे आहे, संभाजी राजेंना नाही.अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला आहे.