लक्ष्मण हाके यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:07 IST2025-09-03T19:06:43+5:302025-09-03T19:07:37+5:30

पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी खासदार तटकरे बुधवारी सकाळी पुण्यात आले होते.

Maratha Reservation No need to pay attention to Laxman Hakes criticism Sunil Tatkare | लक्ष्मण हाके यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही - सुनील तटकरे

लक्ष्मण हाके यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही - सुनील तटकरे

पुणे :मराठा आरक्षण आंदोलनाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या, त्यामुळेच समाधानी होऊन या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. आता यावर प्रा. लक्ष्मण हाके काहीही म्हणत असतील, तर त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी पुण्यात व्यक्त केले.

पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी खासदार तटकरे बुधवारी सकाळी पुण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख व अन्य पदाधिकारी होते. कसबा गणपतीची आरती झाल्यानंतर तटकरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे यांनी मुंबईतील त्यांचे उपोषण थांबवले. त्यावर ओबीसी समाजाचे नेते प्रा. हाके यांनी टीका केली आहे. सरकारने ही फसवणूक केली असल्याचे हाके यांनी म्हटले. जरांगे यांच्या उपोषणापुढे सरकार हतबल झाले व त्यांनी हा अध्यादेश काढला. यातून ओबीसी समाजाच्या नरडीचा घोट घेण्यात आला असल्याचे हाके यांचे म्हणणे आहे.

यावर तटकरे यांनी प्रा. हाके यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगितले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवातीपासूनची भूमिका होती व आजही तीच आहे. महायुती सरकारने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यात त्यांनी उपोषणाला बसलेल्या जरांगे यांच्या काही मागण्या मान्य केल्या. हा सरकारमधील सर्व घटक पक्षांचा एकत्रित निर्णय आहे. त्यातून ओबीसी समाजाला त्याविषयी काही शंका असतील तर त्या अभ्यासपूर्वक मिटविण्यात येतील. सरकारने ओबीसी समाजाच्या भावना समाजावून घ्याव्यात व त्यांना योग्य ती सर्व माहिती द्यावी ते सरकारचे कर्तव्यच आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.

Web Title: Maratha Reservation No need to pay attention to Laxman Hakes criticism Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.