Maratha Reservation: पुणे विभागात ७८ टक्के सर्वेक्षण पूर्ण; दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 10:50 IST2024-02-01T10:49:24+5:302024-02-01T10:50:03+5:30

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गजानन खराटे यांनी पुणे विभागातील सर्वेक्षणाचा आढावा घेतला...

Maratha Reservation: 78 percent survey completed in Pune division; A challenge to complete in two days | Maratha Reservation: पुणे विभागात ७८ टक्के सर्वेक्षण पूर्ण; दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान

Maratha Reservation: पुणे विभागात ७८ टक्के सर्वेक्षण पूर्ण; दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान

पुणे : पुणे विभागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण ७८ टक्के पूर्ण झाले असून अनेक तालुक्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित २२ टक्के काम दोन दिवसांत अर्थात २ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झालेल्या गावांमधील प्रगणकांना गुरुवारपासून (दि. १) कमी काम झालेल्या गावांमध्ये पाठविण्यात येणार आहे. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची मान्यता घेण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दिली. तर पुणे जिल्ह्यात ६५ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गजानन खराटे यांनी पुणे विभागातील सर्वेक्षणाचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली या महापालिकांचे आयुक्त दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

याबाबत राव म्हणाले, “विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम ७८ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये ८५ टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २२ टक्के सर्वेक्षणाचे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याची ग्वाही पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. विभागातील काही जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ज्या गावातील किंवा तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे अशा ठिकाणचे प्रगणक काम कमी झालेल्या ठिकाणी नेमण्यात येणार आहेत. याकरिता मागासवर्ग आयोगाने विशेष परवानगी दिली आहे.”

डॅशबोर्ड दिसण्यात अडचणी

सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेल्या गावांमधील प्रगणकांची अॅपवरील नोंदणी रद्द करून त्यांची नोंदणी कमी काम झालेल्या गावांमध्ये करावी लागणार आहे. त्यासाठी गाव आणि तालुकानिहाय प्रगणकांची नोंदणी गरजेनुसार केली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रणालीच्या पडद्यावर डॅशबोर्ड दिसत नाही. त्यामुळे कोणत्या तालुक्यातील कोणत्या गावांमध्ये सर्वेक्षणाचे किती काम पूर्ण झाले याची माहिती घेणे अशक्य होत आहे, याकडे काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांनी आयोगाचे लक्ष वेधले. त्यावर येत्या दोन दिवसांत डॅशबोर्ड दिसू शकेल, अशी ग्वाही आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांना दिल्याचे राव यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात ६५ टक्केच सर्वेक्षण

दरम्यान पुणे जिल्ह्यात १० लाख ८१ हजार ७९५ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ७ लाख ७ हजार २०२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सर्वाधिक ९६ टक्के सर्वेक्षण मावळ तालुक्यात तर त्याखालोखाल ८८.४० टक्के सर्वेक्षण खेड तालुक्यात झाले आहे. तर सर्वात कमी ३३.८९ टक्के सर्वेक्षण मुळशी तालुक्यात झाले आहे. खेड तालुक्यात १ लाख २३ हजार ४२१ घरे असून आतापर्यंत १ लाख ९ हजार १०६ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

विभागातील पाचही जिल्ह्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत विभागातील सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात येणार आहे.

- सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे

Web Title: Maratha Reservation: 78 percent survey completed in Pune division; A challenge to complete in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.