मराठा क्रांती माेर्चाची "संवाद यात्रा" 26 नाेव्हेंबरला विधानभवनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 20:15 IST2018-11-24T20:13:58+5:302018-11-24T20:15:29+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात १६ नोहेंबरपासून सुरु झालेली संवाद यात्रा २६ नोहेंबर २०१८ रोजी मुंबई विधानभवनावर येऊन पोहचणार अाहे.

मराठा क्रांती माेर्चाची "संवाद यात्रा" 26 नाेव्हेंबरला विधानभवनावर
पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात १६ नोहेंबरपासून सुरु झालेली संवाद यात्रा २६ नोहेंबर २०१८ रोजी मुंबई विधानभवनावर येऊन पोहचणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वय समितीचे राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शांताराम कुंजीर, विनोद साबळे, मिना जाधव, प्राची दुधाणे आदी उपस्थित होते.
कोंढरे म्हणाले, मराठा आरक्षणासह इतर मागण्या तडीस लावण्यासाठी व मान्य केलेल्या मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी हा वाहन मोर्चा आहे. मोर्चद्वारे अनेक मागण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये मराठा आंदोलनातील गुन्हे सरसकट मागे घेऊन पोलिसांकडून होत असलेली दडपशाही थांबवावी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्विकाराव्यात, अॅस्ट्रॉसिटी अॅक्टचा गैरवापर थांबविण्यासाठी सुधारणा करावी. शेतकरी हिताच्या विरुद्ध असलेल्या कायद्यात दुरुस्ती करावी. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला अावश्यक त्या सर्व उपाययाेजना तातडीने करण्यात याव्यात. अादी मागण्या करण्यात येणार अाहेत. तसेच मराठा समाजाला घटनात्मक वैध असे अारक्षण देऊन तसा कायदा अधिवेशनात करावा व त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. अन्यथा मुंबईतील अाझाद मैदानात ठिय्या अांदाेलन करण्यात येईल.