मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड; त्यांचे अण्णा हजारे झालेले नाहीत - कुमार सप्तर्षी

By श्रीकिशन काळे | Published: December 24, 2023 05:55 PM2023-12-24T17:55:44+5:302023-12-24T17:56:24+5:30

मराठा ही मूळात जात नसून हा एक संघ आहे, त्यांच्यात देखील चातुर्वण्य व्यवस्था आहे

Manoj Jarange power is currently heavy on truth His Anna Hazare are not done Kumar Saptarshi | मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड; त्यांचे अण्णा हजारे झालेले नाहीत - कुमार सप्तर्षी

मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड; त्यांचे अण्णा हजारे झालेले नाहीत - कुमार सप्तर्षी

पुणे: मराठे त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. संधीची कवाडे नाकारलेल्या मराठ्यांमधील मनोज जरांगे हे नेतृत्व असून, ते अनघड नेतृत्व आहे. जे जे अनघड असते, ते सत्य असते. मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड आहे. अण्णा हजारे आधी असेच अनघड होते, पण ते जेव्हा राजकीय व्यक्तींच्या संपर्कात आले, तेव्हा काय झाले हे आपल्याला माहितच आहे. मनोज जरांगे यांचा अण्णा हजारे झालेले नाहीत. असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित २३ व्या साहित्यिक कलावंत संमेलनात 'आरक्षण आणि महाराष्ट्राचे भवितव्य' ? या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. कुमार सप्तर्षी बोलत होते. या परिसंवादात सारंग दर्शने, डॉ. बाळासाहेब सराटे आणि प्रा. अविनाश कोल्हे सहभागी झाले होते.

डॉ. सप्तर्षी म्हणाले की, मनोज जरांगे यांची विखे पाटील, उदयनराजे भोसले आदी भोसले घराण्यातील प्रतिनिधी या प्रगत मराठ्यांशी तुलना करून चालणार नाही. प्रगत मराठ्यांनी त्यांच्यातीलच वंचित आणि गरीब मराठ्यांना स्वीकारले नाही. मराठा ही मूळात जात नसून हा एक संघ आहे. त्यांच्यात देखील चातुर्वण्य व्यवस्था आहे. उच्चवर्णीय मराठ्यांनी फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारले आहे. मराठ्यांमधील उतरंडीच्या क्रमानुसार खालच्या श्रेणीतील मराठ्यांना काळानुरूप राजकीय शहाणपण आले असून ते त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. 

प्रा. अविनाश कोल्हे म्हणाले की, ९० सालापासून जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्याने सर्वच परिमाणे बदलली. सरकारने अनेक क्षेत्रातून माघार घेत खाजगीकरण केले. त्यामुळे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या. सध्याची आरक्षणाकरीता सुरू असलेली भांडणे पाहून मनात असा विचार येतो की, समोर असे काय आहे की ज्यासाठी ही भांडणे सुरू आहेत.

सारंग दर्शने म्हणाले की, ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेत प्रगतीचे टप्पे गाठले त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या पुढच्या पिढीचे आरक्षण नाकारले का, हा आत्मचिंतनाचा विषय आहे. प्रगती होऊनही आरक्षणाचे लाभ घेत राहणे, हे कोणत्या तत्वात बसते. आज मराठवाड्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कुणबी- मराठा समाजातील शेतकरीच करीत आहेत. जरांगेंच्या मनात हीच वेदना आहे.

डॉ. बाळासाहेब सराटे म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शेतीच्या पडलेल्या तुकड्यांमुळे वाटेला आलेल्या शेतीतून उदरनिर्वाह होणार नाही, याची जाणीव झाल्यानेच मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आलेला आहे.

Web Title: Manoj Jarange power is currently heavy on truth His Anna Hazare are not done Kumar Saptarshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.