Malegaon Local Body Election Result 2025: माळेगाव नगरपंचायतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता; ५ अपक्षांच्या विजयाने आघाडीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:39 IST2025-12-21T19:38:56+5:302025-12-21T19:39:11+5:30
Malegaon Local Body Election Result 2025 ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे स्वतः मतदार असलेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत शरद पवार गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे.

Malegaon Local Body Election Result 2025: माळेगाव नगरपंचायतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता; ५ अपक्षांच्या विजयाने आघाडीला धक्का
माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप पुरस्कृत जनमत विकास आघाडीने १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. मात्र, तब्बल पाच अपक्ष उमेदवार निवडून आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार रंजनकुमार तावरे यांच्या आघाडीला हा निकाल धक्का देणारा मानला जात आहे. नगराध्यक्षपदी अजित पवार गटाचे सुयोग सातपुते यांचा दणदणीत विजय झाला.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुयोग सातपुते यांना १०,९७८ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गट पुरस्कृत माळेगाव विकास आघाडीचे उमेदवार रुपेश भोसले यांना अवघी १,८२० मते मिळाली. तब्बल ९,१५८ मतांच्या फरकाने सातपुते विजयी झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगराध्यक्षपदासह आठ जागा तर जनमत विकास आघाडीला दोन जागांवर यश मिळाले. विशेष म्हणजे शरद पवार गटाला एकही जागा मिळवता आली नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे स्वतः मतदार असलेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत शरद पवार गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे. सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांनी प्रचारात मोठी ताकद लावली होती; मात्र मतदारांनी शरद पवार–सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवारांना नाकारल्याचे चित्र स्पष्ट झाले.
या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अपक्ष उमेदवारांचा प्रभावी उदय . प्रभाग क्रमांक सहामधून वडापाव विक्रेता वैभव धर्मेंद्र खंडाळे यांनी मिळवलेला दणदणीत विजय चर्चेचा विषय ठरला. तसेच प्रभाग क्रमांक एकमधून अपक्ष दिपाली अनिकेत बोबडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत तीनही विरोधी उमेदवारांना पिछाडीवर टाकले.
चिठ्ठीवर निकाल ठरला
प्रभाग क्रमांक नऊमधील निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लढणाऱ्या अॅड. गायत्री राहुल तावरे आणि अपक्ष जयश्री बाळासाहेब तावरे या दोघींनाही समान ६१६ मते मिळाली. अखेर लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी टाकून काढलेल्या निकालात जयश्री बाळासाहेब तावरे विजयी ठरल्या. अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मिळवलेल्या यशामुळे जनमत विकास आघाडीला विजय मिळूनही आत्मपरीक्षण व विचारमंथनाची वेळ आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.