‘महावितरण अभय योजने’त होणार;४० हजार प्रकरणांची तडजोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:19 IST2024-12-12T15:17:49+5:302024-12-12T15:19:00+5:30

‘महावितरण अभय योजना- २०२४’अंतर्गत दाखलपूर्व ४० हजारांहून अधिक तडजोडयुक्त प्रकरणे निवडण्यात आली आहेत

Mahavitran Abhay Yojana will be done; 40 thousand cases will be compromised | ‘महावितरण अभय योजने’त होणार;४० हजार प्रकरणांची तडजोड

‘महावितरण अभय योजने’त होणार;४० हजार प्रकरणांची तडजोड

वडगाव मावळ : जिल्ह्यात शनिवारी (दि. १४) आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वीज चोरीच्या १२२ तर ‘महावितरण अभय योजना- २०२४’अंतर्गत दाखलपूर्व ४० हजारांहून अधिक तडजोडयुक्त प्रकरणे निवडण्यात आली आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.

पुणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरणामार्फत आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वीज चोरी आणि थकबाकीची प्रकरणे पुणे शहर आणि जिल्ह्यातून दाखल प्रकरणे निवडण्यात आली आहेत. यामध्ये ग्राहकांना तडजोडीच्या माध्यमातून विविध सवलती मिळणार आहेत. तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण आणि जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांनी केले आहे.

या योजनांमध्ये प्रामुख्याने वीज कायदा कलम १३५ आणि १३८ अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांचा समावेश आहे. वीज चोरी प्रकरणात कोर्टात दोषरोपपत्र दाखल नसेल, तर लोकअदालतीमध्ये ग्राहक दाखलपूर्व प्रकरणात तडजोड करू शकतात. वीज चोरी प्रकरणात लोकअदालतीमध्ये तडजोड केल्यास ग्राहकाला वीज बिलात १० ते १५ टक्के सवलत मिळू शकते.

जास्तीत जास्त ग्राहकांनी लोकअदालतीद्वारे वीज चोरीत फौजदारी आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित प्रकरणात तडजोड करून मुक्त व्हावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा न्यायाधीश वडगाव मावळ डी. के. अनभुले, सचिव सोनल पाटील आणि महावितरण यांनी केले आहे.
 
महावितरण अभय योजनेबद्दल
‘महावितरण अभय योजना- २०२४’अंतर्गत बिलाची संपूर्ण थकबाकी भरल्यास १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ केला जातो. तसेच ग्राहकास थकबाकी एकरकमी भरण्याचा किंवा ३० टक्के डाऊन पेमेंटसह जास्तीत जास्त सहा हप्त्यांत भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय उच्चदाब ग्राहकांनी मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास ५ टक्के, तर लघुदाब ग्राहकास १० टक्के अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे. यानंतर ग्राहकास आहे त्याचा जागेवर किंवा अन्यत्र पुन्हा वीजजोडणी दिली जाईल.

Web Title: Mahavitran Abhay Yojana will be done; 40 thousand cases will be compromised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.