महावितरणची वीजचोरीविरुद्ध कडक मोहीम; बारामती परिमंडळात १४४३ जणांवर कारवाई, ४.२३ कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:37 IST2025-12-26T11:37:05+5:302025-12-26T11:37:27+5:30
मीटरमध्ये छेडछाड किंवा फेरफार करणे, विजेच्या वाहिन्यांवर आकडे टाकणे, अनधिकृत वीजवापर आला उघडकीस

महावितरणची वीजचोरीविरुद्ध कडक मोहीम; बारामती परिमंडळात १४४३ जणांवर कारवाई, ४.२३ कोटींचा दंड
बारामती: महावितरणने विजेची वाढती हानी रोखण्यासाठी वीजचोरीविरुद्ध कडक पावले उचलली असून, बारामती परिमंडळात एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत व्यापक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण १४४३ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली असून ४ कोटी २३ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
मीटरमध्ये छेडछाड किंवा फेरफार करणे, विजेच्या वाहिन्यांवर आकडे टाकणे, अनधिकृत वीजवापर करणे अशा विविध प्रकारच्या वीजचोरीचे प्रकार या तपासणीत उघडकीस आले आहेत. या प्रकरणांत भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ व १३६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. महावितरणने ग्राहकांना क्षणिक आर्थिक फायद्यासाठी अशा गैरप्रकारांचा अवलंब करू नये, तसेच केवळ अधिकृत वीजवापर करावा, असे आवाहन केले आहे.
मंडळनिहाय कारवाई
बारामती मंडळात २३९ जणांवर कारवाई करून १ कोटी ११ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सातारा मंडळात २९४ प्रकरणांत ६३ लाख ५५ हजार रुपये, तर सोलापूर मंडळात सर्वाधिक ९१० जणांवर कारवाई करत २ कोटी ४८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विभागनिहाय आकडेवारी
बारामती मंडळातील बारामती विभागात ८४ प्रकरणांत १६ लाख ४५ हजार रुपये, केडगाव विभागात १४९ प्रकरणांत ८५ लाख २८ हजार रुपये, तर सासवड विभागात ६ प्रकरणांत १० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.
सातारा मंडळात कराड विभागात ६९ प्रकरणांत २३ लाख २२ हजार रुपये, फलटण विभागात ६८ प्रकरणांत ४ लाख ३१ हजार रुपये, सातारा विभागात ६० प्रकरणांत ७ लाख ९६ हजार रुपये, वडूज विभागात ६८ प्रकरणांत २२ लाख १८ हजार रुपये, तर वाई विभागात २९ प्रकरणांत ५ लाख ८८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सोलापूर मंडळात अकलूज विभागात ९६ प्रकरणांत ५६ लाख ७५ हजार रुपये, बार्शी विभागात २२२ प्रकरणांत ५० लाख २३ हजार रुपये, पंढरपूर विभागात ३५७ प्रकरणांत ६४ लाख ६८ हजार रुपये, सोलापूर ग्रामीण विभागात ११० प्रकरणांत १५ लाख ९८ हजार रुपये, तर सोलापूर शहर विभागात १२५ प्रकरणांत ६० लाख ८४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वीजचोरीविरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.