पुणे : राज्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये अनेक भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात गारपीट देखील होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला. राज्यातून थंडी बऱ्यापैकी गायब झाली असून, ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. ईशान्यकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणारे वारे यांचा मेळ मध्य भारतावर होत असल्याने पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी (दि.२७) तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा ऑरेंज अलर्ट दिला, तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यामध्ये गुरूवारी (दि.२६) म्हणजे आज पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळतील, तर शुक्रवारी (दि.२७) धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजासह गारपीटीचा ऑरेंज अलर्ट दिला.राज्यातील पुणे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात आणि अकोला, अमरावती बुलढाणा, वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकत हळूहळू निवळत आहे. पश्चिमी चक्रावात, राजस्थान आणि परिसरावर असलेले चक्राकार वारे, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले. त्यामुळे ही सर्व हवामान स्थिती पहायला मिळत आहे.