Maharashtra Weather Update : थंडीत घट, राज्यात ढगाळ वातावरण, पावसाचा अंदाज
By श्रीकिशन काळे | Updated: December 23, 2024 16:03 IST2024-12-23T15:59:43+5:302024-12-23T16:03:05+5:30
काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Maharashtra Weather Update : थंडीत घट, राज्यात ढगाळ वातावरण, पावसाचा अंदाज
पुणे : राज्यामध्ये दोन दिवसांपासून थंडीत घट झाली असून, पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारी आणि मंगळवारी राज्यामधील काही भागात अंशतः ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यातही दुपारपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
सध्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली मंगळवारपर्यंत (दि.२४) उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाकाही कमी - अधिक होत आहे.
राज्यामध्ये सोमवारी (दि.२३) मंगळवारी आणि बुधवारी काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसेच तापमानात चढ उतार राहणार आहे. गुरुवारी पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये काही भागात ढगाळ हवामान राहणार असून, हलक्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये काही भागात वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर शुक्रवारी (दि.२७) पुणे, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट आहे. तर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता शुक्रवार दि. २७ डिसेंबरला संपूर्ण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात असे एकूण २५ जिल्ह्यांत तूरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम ह्या जिल्ह्यात व लगतच्या परिसरात गारपीटीची शक्यता अधिक जाणवते, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
गारपीटीची शक्यता कश्यामुळे वाढली?
सध्याच्या २६ डिसेंबर दरम्यान देशात प्रवेशलेले प्रखर पश्चिम प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून व राजस्थानच्या आग्नेयला दीड ते दोन किमी. उंचीपर्यंतच्या पातळीतील थंड कोरडे चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. तर ८०० मीटर उंचीपर्यंतच्या खालच्या पातळीतील अरबी समुद्रातून नैरुक्त दिशेकडून वारे येत असून, बं. उपसागरातून पूर्वे दिशेकडून येणारे आर्द्रतायुक्त वारे अश्या तीन वाऱ्यांच्या टक्करीतून घनीभवन होवून गारपीट होण्याची शक्यता निर्माण होत आहे, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.