निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांच्या वेळापत्रकासोबतच महाराष्ट्रातीलबारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फार कमी आहे. बारामतीतील अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला नाव बदलून त्याऐवजी दिवंगत नेते अजित पवार यांचे नाव दिल्याने धनगर समाजात नाराजी आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, पाच राज्यांच्या निवडणुका एप्रिल महिन्यात पार पडणार असून मतमोजणी मे महिन्यात होईल. याच काळात महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी येथेही मतदान प्रक्रिया पार पडेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आधीच स्पष्ट केले आहे की, ते बारामती पोटनिवडणूक लढवणार नाहीत. अजित पवारांबद्दलच्या आदरापोटी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भावना महाविकास आघाडीतील काही नेत्यांची होती. मात्र, स्थानिक पातळीवर निर्माण झालेला एक नवा वाद या बिनविरोधच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे.
बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयावरून बारामतीत धनगर समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. धनगर समाजाचे म्हणणे आहे की, त्यांचा अजित पवारांच्या नावाला वैयक्तिक विरोध नाही, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव बदलून किंवा त्याऐवजी दुसरे नाव देणे हे त्यांना मान्य नाही. गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाच्या विविध संघटनांनी या नामकरणाविरोधात निषेध मोर्चा काढला आहे. जोपर्यंत रुग्णालयाचे नाव बदलले जात नाही, तोपर्यंत आम्ही ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांना धक्का देत धनगर समाजाने पोटनिवडणुकीत आपला स्वतंत्र उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. जर धनगर समाजाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला, तर बारामतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) उमेदवार असण्याची दाट शक्यता असून, त्यांच्यासमोर कोणाचे आव्हान उभे राहते? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
Web Summary : Baramati by-election unlikely to be unopposed. Naming a hospital after Ajit Pawar has angered the Dhangar community, who threaten to field a candidate, potentially challenging Sunetra Pawar.
Web Summary : बारामती उपचुनाव में निर्विरोध चुनाव की संभावना कम। अजित पवार के नाम पर अस्पताल का नामकरण होने से धनगर समुदाय नाराज, उम्मीदवार उतारने की धमकी, सुनेत्रा पवार को चुनौती।