Maharashtra: पुण्यातील किमान तापमानात वाढ, विदर्भात उष्णतेची लाट येणार
By श्रीकिशन काळे | Updated: April 6, 2024 16:06 IST2024-04-06T16:06:42+5:302024-04-06T16:06:59+5:30
शहरातील २९ वेदर स्टेशनपैकी २२ ठिकाणचे किमान तापमान हे २० अंशाच्यावर नोंदवले गेले आहे. यावरून पुणे ‘हॉट’ ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे....

Maharashtra: पुण्यातील किमान तापमानात वाढ, विदर्भात उष्णतेची लाट येणार
पुणे : शहरातील तापमान चांगलेच वाढले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुण्यातच १९.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. पुण्यातील किमान तापमानाचा पाराही वडगावशेरीला २७.१ अंशावर तर शिवाजीनगरला १९.५ अंशावर आहे. शहरातील २९ वेदर स्टेशनपैकी २२ ठिकाणचे किमान तापमान हे २० अंशाच्यावर नोंदवले गेले आहे. यावरून पुणे ‘हॉट’ ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
उत्तरेकडून उष्ण व दमट हवा आपल्याकडे येत आहे. त्यामुळे राज्यातील तापमान चाळशीपार जात आहे. आज तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून तीन दिवस विदर्भात ही लाट असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुण्यात देखील किमान तापमान वाढल्याने रात्री देखील उकाडा जाणवत आहे. दिवसाही वडगावशेरी, मगरपट्टा, चिंचवड, कोरेगाव पार्क, हडपसर ही ठिकाणे ‘हॉट’ ठरत आहेत. या ठिकाणचे किमान तापमान २४ ते २७ अंशाच्या दरम्यान आहे.
पुणे शहरातील किमान तापमान
वडगावशेरी : २७.१
मगरपट्टा : २६.३
चिंचवड : २५.०
कोरेगाव पार्क : २४.३
हडपसर : २४.१
पाषाण : २०.५
शिवाजीनगर : १९.५