Maharashtra election 2019 : असा होता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीचा खास स्वराज्य रक्षक फेटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 17:09 IST2019-10-18T16:58:04+5:302019-10-18T17:09:54+5:30
Maharashtra election 2019 : गुरुवारी महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेकरिता पुणे शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत मोदी यांचा सत्कार करताना त्यांना खास स्वराज्य रक्षक फेटा आणि उपरणे देण्यात आले.

Maharashtra election 2019 : असा होता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीचा खास स्वराज्य रक्षक फेटा
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी पुण्यात झालेल्या सभेत त्यांना देण्यात आलेल्या स्वराज्य रक्षक फेट्याची सर्वत्र चर्चा आहे. सोन्याचा मुलामा देण्यात आलेल्या या फेट्यावर कमळ आणि चक्र यांचे नाजूक नक्षीकाम करण्यात आले होते.
गुरुवारी महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेकरिता पुणे शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत मोदी यांचा सत्कार करताना त्यांना खास स्वराज्य रक्षक फेटा आणि उपरणे देण्यात आले. कमळ आणि चक्र यांच्या नक्षीकामाने हा फेटा विशेष उठून दिसत होता.
शहरातील मुरुडकर फेटेवाले'च्या गिरीश मुरुडकर आणि त्यांच्या कारागिरांनी मिळून हा फेटा बनवला आहे. त्याबाबत माहिती देताना मुरुडकर म्हणाले की, ' फेट्याच्या एका बाजूला चक्रे लावण्यात आली असून ती खालून वरच्या दिशेने फिरतात. त्यातून विकासाचा रथ वरच्या दिशेने जात असल्याचे प्रतीक व्यक्त करण्यात आले आहे. दुसरीकडे याच फेट्यावर भाजपचे चिन्ह असलेले कमळ लावण्यात आले आहे. त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून संपूर्ण रेशमी कापडात आणि भगव्या रंगात हा फेटा बनवण्यात आला.
या फेट्याकरिता अनेक पॅटर्न आणि डिझाईन तयार करण्यात आली होती. अखेर स्वराज्य रक्षक पॅटर्न अंतिम करून त्यावर काम करण्यात आले. या फेट्याचे काम सुमारे आठवडाभर सुरु होते. काल मोदी यांच्या सभेत त्यांच्या फेट्याविषयी पुणेकरांसह सर्वत्र उत्सुकता होती.