Maharashtra Election 2019: 'करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’अशी सध्याची भाजपाची परिस्थिती'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 15:31 IST2019-10-11T15:30:27+5:302019-10-11T15:31:32+5:30
कुणी मुद्याचे बोलतच नाही. महागाईवर बोला.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला, असा सल्लाही भाजप आणि शिवसेनेच्या लोकांना शरद पवार यांनी दिला.

Maharashtra Election 2019: 'करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’अशी सध्याची भाजपाची परिस्थिती'
पुणे – पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घुसून मारुन घेतलं मात्र क्रेडिट कुणी घेतले? असा उपरोधिक टोला लगावतानाच 'करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव अशी सध्याची भाजपाची परिस्थिती आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उरळी कांचन येथील जाहीर सभेत केली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र श्रेय मोदी घेण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही शरद पवार यांनी केला.
आज पुणे जिल्हयातील शिरुर मतदारसंघातील उरळी कांचन येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली .यावेळी शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला. आघाडी सरकार असताना शिरूर भागात कारखानदारी आणली गेली. हे काही फडणवीस सरकारच्या काळात झालेली कामं नाहीत. मात्र आज अवस्था काय आहे ? पिंपरी-चिंचवड येथे मुलांना नोकऱ्यांमधून काढून टाकत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. परिस्थिती सांभाळण्याची क्षमता यांच्यात नाही असा आरोपही शरद पवार यांनी केला.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. मोदी एका सभेत म्हणाले की, मैं घुस के मारूंगा.. घुसून मारले सैन्याने, हवाईदलाने.. मात्र याचे क्रेडिट कोणी घेतले? करून गेलं गाव आणि भलत्याचं नाव, अशी सध्याची परिस्थिती आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 11, 2019
तसेच निवडणुकांच्या प्रचाराचा पारा सध्या चढू लागला आहे. गुजरातचे एक भले 'मोठे' गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नाही तरी यांच्या तोंडात माझेच नाव. निवडणूक शरद पवार या एका नावावरच लढवत आहेत अशा शब्दात अमित शहा यांचे नाव न घेता शरद पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला.
मला विचारतात ३७० वर उत्तर द्या. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. सभागृहात काही नोंद आहे का ? मी काही गोंधळ केला का ? जाब विचारता कसला ? यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून ३७०चा मुद्दा पुढे केला जात आहे. अमित शाह महाराष्ट्रात सांगतात की, आता काश्मीरमध्ये शेती करणे शक्य आहे. मला सांगा इथलं घरदार सोडून काश्मीरात कोण जाणार शेती करायला ? आहे का कोणी मायेचा पूत ?अशी विचारणा शरद पवार यांनी जाहीर सभेत केली.
हे गृहस्थ मला विचारतात ३७० वर उत्तर द्या. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. सभागृहात माझ्याबद्दल काही नोंद आहे का? मी काही गोंधळ केला का? मग जाब कसला विचारता? यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून कलम ३७०चा मुद्दा पुढे केला जात आहे.#शिरूर
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 11, 2019
कुणी मुद्याचे बोलतच नाही. महागाईवर बोला.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला, असा सल्लाही भाजप आणि शिवसेनेच्या लोकांना शरद पवार यांनी दिला. या साऱ्यांना भानावर आणायचे आहे. आपल्याला परिवर्तन करायचे आहे. बदल घडवायचा आहे म्हणून अशोक पवार यांना निवडून द्यायचे आहे. तुम्ही संधी दिली तेव्हा अशोक पवार यांनी चांगले काम केले. कारखाना योग्यप्रकारे चालवला मात्र तुम्ही मागच्या वेळी वेगळा निर्णय दिला. त्यामुळे मागे घेतला तसा निर्णय घेवू नका असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.
दरम्यान, अनेक जण आज पक्ष सोडून जात आहे. पक्षात रहायचे की नाही हे ज्याचे त्याचे मत आहे. सोबत आले तर बरं आहे. नाही आले तर दुखवटयाचा ठराव मांडून पुढे जायचं असेही शरद पवार आपल्या भाषणात शेवटी म्हणाले.