महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणेकरांचा मतदारांचा टक्का कमीच, ग्रामीणमध्ये भरभरून मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 20:43 IST2019-10-21T20:32:47+5:302019-10-21T20:43:57+5:30
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पुणेकरांचा मतदानाचा टक्का कमीच राहिला.

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणेकरांचा मतदारांचा टक्का कमीच, ग्रामीणमध्ये भरभरून मतदान
पुणे : लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पुणेकरांचामतदानाचा टक्का कमीच राहिला. पुणे शहरातील आठ मतदारसंघात सर्वात कमी ४६ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागात मात्र सर्वच ठिकाणी भरभरून मतदान झाले. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघात सरासरी ५५ टक्के मतदान झाले.
पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत होता. रविवारी दिवसभर पावसाची संततधार होती. सोमवारीही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, सोमवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे मतदानात कोणताही व्यत्यय आला नाही. मात्र, तरीही मतदानात फारसा उत्साह नव्हता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात ३६.०८, पुणे कॅन्टोंमेंट -३८.४, शिवाजीनगर -३९.०७, वडगाव शेरी ४१.०८, कोथरुड - ४३.२३, पर्वती- ४५.०७ आणि हडपसरमध्ये ४८.८४ टक्के मतदान झाले होते. पिंपरीमध्येही केवळ ४२.६७, चिंचवडमध्ये ५१.३३, भोसरीमध्ये ५२.५२ टक्के मतदान झाले. तुलनेने ग्रामीण भागात मात्र मतदानाचे प्रमाण चांगले होते. भारतीय जनता पक्षाचे हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात चुरस असलेल्या इंदापूरमध्ये तब्बल ७४.२५ टक्के मतदान झाले होते. मावळमध्येही भाजपाचे बंडखोर सुनील शेळके राष्ट्रवादीकडून राज्य मंत्री बाळा भेगडे यांना आव्हान दिल्याने निर्माण झालेल्या चुरशीच्या वातावरणामुळे ६४.३६ टक्के मतदान झाले. बारामतीतत ६४.०६ टक्के, आंबेगाव- ६३, खेड -६१.३९, दोंड ६१.१५, जुन्नर ६०.०७, भोर- ५९.६५, शिरूर ५८.८१, पुरंदर ५७.६ टक्के मतदान झाले.
मतदान यंत्रात बिघाडाचे तुरळक प्रकार वगळता मतदान सुरळीत झाले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी मतदान केंद्राच्या परिसरात पावसामुळे चिखल झाला होता. प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्था केली होती. बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे तर शाळेच्या मैदानावर पाणी साठल्याने मतदान केंद्रावर जाण्यासाठी प्रशासनाने चार ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या जोडून पूल तयार केला होता. त्यावरून जाऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वडगाव शेरीतील एका मतदारसंघात विजपुरवठा खंडीत झाल्याने मेणबत्तीच्या उजेडात मतदान घेण्यात आले.