Maharashtra Election 2019: Millions fight due to 'Dada' candidacy | Maharashtra Election 2019: ‘दादा’ मंडळींच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी लढती

Maharashtra Election 2019: ‘दादा’ मंडळींच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी लढती

- अविनाश थोरात

पुणे जिल्हा एके काळचा राष्टÑवादीचा बालेकिल्ला; पण गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने तो उद्ध्वस्त केला. राष्टÑवादी कॉँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि कॉँग्रेसबरोबरचा बेबनाव याबरोबरच राष्टÑवादी कॉँग्रेसला अती आत्मविश्वास नडला. परंतु, या वेळी राष्टÑवादी कॉँग्रेसचे तारे जमिनीवर आल्याने जिल्ह्यात चुरस वाढली आहे.

एकाच मतदारसंघात दोन-तीन शिलेदार तयार करायचे आणि त्यांना झुंजवत ठेवायचे, ही आजपर्यंतची राष्टÑवादीची रणनीती. त्यामुळे त्यांना फटका बसला आणि बसतोय. परंतु, या वेळी त्यांनी वास्तवाचे भान ठेवून कॉँग्रेसबरोबरचे संबंध सुधारले. काही ठिकाणी अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे चुरस वाढली आहे.

पुरंदरची जागा कॉँगे्रसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांना सोडून संपूर्ण राष्टÑवादी त्यांच्या मागे उभी केल्याने शिवसेनेचे विद्यमान मंत्री विजय शिवतारे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. मावळमध्ये ऐन वेळी भाजपचे बंडखोर सुनील शेळके यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली. भोसरीमध्ये विलास लांडे आणि चिंचवडमध्ये अपक्ष लढणारे राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे.

मात्र, शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीनेही संपूर्ण ताकद लावली आहे. गेल्या वेळी वेगवेगळे लढूनही युतीने १६ जागा मिळविल्या होत्या. या वेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा कॉँग्रेसचा ज्येष्ठ नेता भाजपामध्ये आहे. याशिवाय, राष्टÑवादीतील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचे भाजपात प्रवेश झाले आहेत. त्यामुळे युतीची ताकद वाढली आहे. परिणामी, शरद पवार यांच्या जिल्ह्यात राष्टÑवादी कॉँग्रेसपुढे आव्हान उभे आहे.

रंगतदार लढती
कोथरूड मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि मनसेचे किशोर शिंदे यांच्यात लढत होत आहे. स्थानिक विरुद्ध बाहेरचा, असे स्वरूप या लढतीला आले आहे. कॉँग्रेस आणि राष्टÑवादीने येथे मनसेला पाठिंबा दिला आहे. भाजपानेही आपली सर्व ताकद येथे लावली आहे.
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील भाजपाकडून लढत आहेत. राष्टÑवादीचे दत्तात्रेय भरणे यांच्याशी त्यांची लढत आहे. राष्टÑवादीच्या काही नाराजांनी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, ही लढत अजित पवार विरुद्ध पाटील, अशीच आहे.
जुन्नर विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे शिवसेनेकडून लढत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आशा बुचके यांनी बंडखोरी केली आहे. राष्टÑवादीकडून अतुल बेनके लढत आहेत. कॉँग्रेसही सोबत आहे. खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) पुण्यातील वाहतूककोंडी, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, कचरा
२) ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव
३) आंतरराष्टÑीय विमानतळ, औद्योगिक वसाहतींमधील गुंडगिरी
४) ग्रामीण-शहरी पाण्याचा वाद, शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी

- बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांना उभे करून भाजपाने जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.
- पुणे शहरातील आठही मतदारसंघात शिवसेना-भाजपा विरुद्ध कॉँग्रेस-राष्टÑवादी लढाई आहे. कसबा, हडपसर येथे मनसे कोणाची मते घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या वेळी सर्व ठिकाणी भाजपाने विजय मिळविला होता. त्यातील किती जागा भाजपा राखते महत्त्वाचे ठरणार आहे.
- खडकवासला मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर रमेश कोंडे यांची बंडखोरी शमविण्यात यश आले. मात्र, कसब्यातून शिवसेनेचे विशाल धनवडे यांची बंडखोरी कायम आहे. त्यामुळे युतीतील कार्यकर्त्यांचे पूर्णपणे मनोमिलन झाले, अशी परिस्थिती नाही.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election 2019: Millions fight due to 'Dada' candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.