Maharashtra Election 2019 : Chief Minister insults democracy: Vishwajit Kadam | Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्र्यांकडून लोकशाहीचा अपमान : विश्वजित कदम
Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्र्यांकडून लोकशाहीचा अपमान : विश्वजित कदम

ठळक मुद्देकदम शनिवारी कसबा व पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात

पुणे : ' विधानसभा निवडणुकीत विरोधकच नाही, कुणासोबत लढायचे ' या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडून लोकशाहीचा अपमान केला जात असल्याची टीका केली. तसेच जनतेच्या मुळ प्रश्नांना बगल देत भावनिक मुद्यांवरच प्रचार केला जात असून राजकारणाची दिशा बदलली असल्याचेही कदम म्हणाले.
कदम शनिवारी कसबा व पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपा-शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, देशात राष्ट्रीय पक्षांसह अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षांना मिळालेली मते भाजपापेक्षा जास्त आहेत. राज्यात सर्व २८८ मतदारसंघात भाजपा विरोधात उमेदवार आहेत. पण त्यांना लोकशाहीचा विसर पडलेला दिसतो. मागील पाच वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहेत. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली दिलेली कर्जमाफी कागदोपत्रीच राहिली आहे. 
देशामध्ये भितीचे वातावरण आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसजीमुळे त्रासलेले व्यापरी, शेतकरी आत्महत्या असे अनेक प्रश्न असताना त्यावर बोलले जात नाही. केवळ ३७० कलमासारख्या भावनिक मुद्द्यांवर प्रचार केला जात आहे. राजकाराणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर लक्ष हटविले जात आहे. पण जनतेमध्ये नाराजी असून मतदानातून हा आक्रोश बाहेर येईल. बहुमताने आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.
------------
पुण्याला न्याय नाही
पुण्याला चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन पुर्ण करता आले नाही. कोथरुडमधील उड्डाण पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. शहराला विविध योजनांतून मिळणारा २२०० कोटी रुपयांचा निधी मिळालेला नाही. पुण्यात भाजपाचे दोन खासदार, आठ आमदार आणि शंभरहून अधिक नगरसेवक असताना पुणेकरांना न्याय देता आला नाही, अशी टीका कदम यांनी केली.
-----


Web Title: Maharashtra Election 2019 : Chief Minister insults democracy: Vishwajit Kadam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.