“राज ठाकरेंची हिंदुत्वाची शाल नवी की जुनी?”; फडणवीस म्हणाले, “हे काळच ठरवेल…”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 20:25 IST2022-04-19T20:24:56+5:302022-04-19T20:25:22+5:30
काही पक्षांना हिंदुत्वाची शाल पांघरावी लागत आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टोला लगावला.

“राज ठाकरेंची हिंदुत्वाची शाल नवी की जुनी?”; फडणवीस म्हणाले, “हे काळच ठरवेल…”
काही पक्षांना हिंदुत्वाची शाल पांघरावी लागत आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी टोला लगावला. ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यादरम्यान फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसाना हा नेमका टोला कोणाला लगावला? जुन्या मित्राला की होऊ घातलेल्या नव्या मित्राला? रोख कोणाकडे आहे?, असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीसांनी हे वक्तव्य केलं.
“महाराष्ट्रातील फार मोठे साहित्यिक आहेत, त्यांनी १५-२० वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलंय. हिंदुत्वाची शाल कोणी पांघरली आहे आणि खरं हिंदुत्व हे कोणाच्या रक्तात आहे हे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे जरूर ते पुस्तक वाचावं. त्यामुळे मी कोणाला बोललोय ते त्यांनाही समजलेलं असावं आणि जनतेलाही,” असं फडणवीस म्हणाले. यानंतर त्यांना राज ठाकरे यांनी पांघरलेली ही जी शाल आहे ती नवी शाल आहे का जुनी असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी ते काळच ठरवणार असल्याचं म्हटलं.
“… तरी भ्रष्टाचार बाहेर काढणारच”
“आमचा घाव वर्मी बसला याचं आम्हाला समाधान आहे. ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढतोय, त्यांना आता अस्वस्थ वाटतंय. म्हणून ते आमच्या यात्रेवर हल्ला करतायत. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो कितीही हल्ला केला तरी पोलखोल थांबणार नाही, आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढतच राहू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यासाठी सुरक्षा पुरवली जाणार की नाही, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. “हे सांगण्याचा अधिकार माझा नाही आणि ते सांगण्याची आवश्यकताही नाही. यासंदर्भातील सर्व निर्णय कायदा आणि सुव्यवस्था पाहणारे त्या त्या राज्यातील लोक पाहत असतात. यासंदर्भात संबंधित व्यक्ती उत्तर देतील,” असं फडणवीस त्यावर म्हणाले.