Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदमुळे मंगळवारपासून सुरू होणार पुणे शहरातील महाविद्यालये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 17:20 IST2021-10-09T17:11:18+5:302021-10-09T17:20:21+5:30
लखीमपूर खेरी हत्याकांडाचा निषेध म्हणून राज्यात महाराष्ट्र बंद ठेवण्यात येत असल्याचे महाविकास आघाडीकडून सांगितले आहे

Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदमुळे मंगळवारपासून सुरू होणार पुणे शहरातील महाविद्यालये
पुणे: काल झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. पण आता शहरातील महाविद्यालये मंगळवारी सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. लखीमपूर खेरी हत्याकांडाचा निषेध म्हणून सोमवारी (11 ऑक्टोबर) राज्यातील महाविकास आघाडीसोबत, शेतकरी संघटना आणि विविध कामगार संघटनांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अडचणी येऊ शकतील म्हणून महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
लखीमपूर खेरी प्रकरण नेमके काय?
लखीमपूर खेरी हत्याकांडाचा निषेध म्हणून राज्यात महाराष्ट्र बंद ठेवण्यात येत असल्याचे महाविकास आघाडीकडून सांगितले आहे. उत्तर प्रदेशात ही घटना घडली असून यामध्ये शेतकरी शांततेत आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर चारचाकी घालण्यात आली होती. यामध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. लखीमपूर खेरी हत्याकांडामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. हा हत्याकांड भाजप सरकारकडून करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.