महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:38 IST2025-04-18T18:36:20+5:302025-04-18T18:38:36+5:30
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा; शकुंतला खटावकर, प्रदीप गंधे यांच्यासह १५९ क्रीडावीरांचा गौरव

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
पुणे : २०३६चे ऑलिम्पिक भारतात व्हावे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने आपल्या खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी सज्ज व्हावे. ‘विकसित भारत’बाबत चर्चा करत असतानाच आपण ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके मिळविण्याबाबतही विचार केला पाहिजेे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी पुण्यात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभात केले.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पणनमंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे उपस्थित होते.
पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी-म्हाळुंगे येथे २०२२-२३ व २०२३-२४ असा दोन वर्षांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे व माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पॅरालिम्पिक पदकविजेता सचिन खिलारी, खो-खोपटू प्रियंका इंगळे, सुयश गरगटे, नेमबाज रुद्रांक्ष पाटील, क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड, देविका वैद्य, राहुल त्रिपाठी हाॅकीपटू अक्षता ढेकळे यांच्यासह १५९ जणांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्राने देशाचे अनेक क्षेत्रात नेतृत्व केले आहे, असे प्रतिपादन करून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये आज क्रीडा संकुले उभारण्यात राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने पुढाकार घेतला आहे. अशा वेळी शाळा महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे खेळ हे ही एक करियरची संधी आहे हे विद्यार्थ्यांमध्ये रुजविले पाहिजे.
शिवछत्रपती पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवछत्रपतींच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार सर्वच पुरस्कार्थींचा अभिमान वाढवणारा आहे. पदकांची भरारी आपण सुरू केली आहे. राष्ट्रीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी उंचवावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चांगल्या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी आपण परदेशी पाठवतो पण आता त्यांच्यासोबत त्यांचे प्रशिक्षक, फिजिओ यांनाही परदेशी जाता येणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करण्यासाठी हे गरजेचे आहे. खेळासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. तालुक्यापर्यंत चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्राच्या खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दरवर्षीचा पुरस्कार सोहळा त्याच वर्षी झाला पाहिजे अशी माझी क्रीडामंत्री, अधिकार्यांना विनंती आहे. आगामी पुरवणी मागण्यांमध्ये क्रीडा विभागाला वाढीव रक्कम मंजूर करून त्यांची मागणी पूर्ण केली जाईल. सर्व पुरस्कारार्थींचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही खेळाडू घडवण्याचे काम करा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणार्या खेळाडूंचे कौतुक करून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे असे सांगून राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पुरस्कारार्थींच्या नावापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जोडले जाणार आहे. त्यामुळे सर्व पुरस्कारार्थींना आयुष्यभर त्याचा अभिमान वाटेल. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी करणार्या खेळाडूंना चांगली पारितोषिक रक्कम आणि थेट नियुक्ती देत क्रीडा क्षेत्रासाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी केले.
निधी देताना शिष्टचार पाळू नका : राज्यपाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मला शिष्टचारानुसार केवळ पाच मिनिटे बोलण्यास दिले असल्याचे सांगितले होते. हाच धागा पकडून राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणात अजित पवार जी तुम्ही तुमच्या भाषणात वेळेचा शिष्टचार पाळला. पण क्रीडा विभागाला निधी देताना कुठलाही शिष्टचार पाळू नका. अधिकाधिक निधी या विभागाला द्या
पाऊणे दोन तास रखडला कार्यक्रम
पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी सकाळी अकरा वाजताची वेळ देण्यात आली होती. पण मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाल्यामुळे सुमारे पाऊणे दोन तास कार्यक्रम रखडला. त्यामुळे खेळाडूंसह पालकांनाही तिष्ठत रहावे लागले