महापरिनिर्वाण दिन विशेष : ...आणि बाबासाहेब बाेलू लागले..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:08 IST2024-12-06T14:08:15+5:302024-12-06T14:08:15+5:30
संग्रहालयाच्या आत प्रवेश केल्यानंतर स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरचे भाषण करत आहे. असा अनुभव पुणेकरांना घेता येणार आहे.

महापरिनिर्वाण दिन विशेष : ...आणि बाबासाहेब बाेलू लागले..!
पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उघड्या डोळ्यांचे बुद्ध आवडायचे म्हणून त्यांच्या सन्मानार्थ सिम्बायाेसिस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या परिसरात ४ फूट उंचीची डोळे उघडे असलेल्या बुद्धांची मूर्ती नुकतीच बसविण्यात आली आहे.
त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी (दि. ६) ही मूर्ती पुणेकरांना पाहता येणार आहे तसेच संग्रहालयाच्या आत प्रवेश केल्यानंतर स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरचे भाषण करत आहे, असा अनुभव पुणेकरांना घेता येणार आहे. संसदेत गाजलेले ऐतिहासिक भाषण थ्रीडी होलो ग्रामच्या माध्यमातून समोर बसून ऐकणे ही पर्वणीच या निमित्ताने मिळत आहे.
अध्यक्ष महोदय, वैचारिक भूमिका मांडण्यासाठी मी असा विचार केला असता की, या देशातील प्रत्येक पक्षाला, प्रत्येक विभागाला अशा वाटचालीसाठी प्रवृत्त करायचे, तर बहुमत असलेल्या पक्षाने या वाटचालीत सहभागी होण्यासाठी तयार नसलेल्या लोकांच्या पूर्वग्रहांनाही सवलत देण्याची मुत्सद्देगिरी दाखविली पाहिजे; आणि याच हेतूने मी हे आवाहन करू इच्छितो. आपण लोकांना घाबरवणाऱ्या घोषणा बाजूला ठेवू या, शब्द बाजूला ठेवूया. आपल्या विरोधकांच्या पूर्वग्रहांनाही आपण स्वीकारूया, त्यांना सामावून घेऊ या; म्हणजे त्या मार्गावर वाटचाल करताना तेही आपल्यात स्वेच्छेने सामील होतील आणि मी म्हटल्याप्रमाणे, आपण अशी वाटचाल दीर्घ काळ केली, तर नक्कीच एकता प्रस्थापित होईल. हे ऐतिहासिक भाषण आजच्या काळात तुम्हाला समोर बसून ऐकायला मिळत आहे. हे भाषण आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. संसदेत संविधान सभेत १७ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संसदेत गाजलेले ऐतिहासिक भाषण आजच्या काळात तुम्हाला समोर बसून ऐकायला मिळत आहे ते थ्रीडी होलोग्राममुळे. सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि स्मारकात तंत्रज्ञानाचा वापर करून डॉ. आंबेडकर यांचा थ्रीडी होलोग्राम तयार केला असून, डॉ. आंबेडकर यांनी संसदेत दिलेले ऐतिहासिक भाषण पुणेकर अनुभवत आहेत.
तंत्रज्ञानाद्वारे साकारलेला हा होलोग्राम आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असून, संग्रहालयातील उभारलेल्या या होलोग्रामद्वारे प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासमोर बोलत असल्याची अनुभूती मिळत आहे. सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि स्मारकात तंत्रज्ञानाचा वापर करून संसदेत डॉ. आंबेडकर बोलत आहेत, अशी अनुभूती होलोग्राम पाहणाऱ्यांना मिळते. यासोबतच संग्रहालयाकडून सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर केला जात असून, त्याद्वारे संग्रहालयातील माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सम्यक दृष्टी आणि सम्यक ज्ञान या गोष्टींशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान जोडले गेले आहे. जगातील दु:ख पाहायचे असतील तर डोळे उघडे ठेवले पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उघड्या डोळ्यांची बुद्ध मूर्ती विशेष प्रिय होती. ते ज्या बुद्ध मूर्ती समोर दररोज नतमस्तक होत असत ती बुद्ध मूर्ती सिम्बायाेसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकामध्ये आहे. - डॉ. संजीवनी मुजुमदार, मानद संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक