Dagdusheth Ganpati: अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठच्या बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:29 IST2025-04-30T16:28:28+5:302025-04-30T16:29:13+5:30

आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार

Mahanaivedi of 11,000 mangoes offered to Dagdusheth's Bappa on the occasion of Akshaya Tritiya | Dagdusheth Ganpati: अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठच्या बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

Dagdusheth Ganpati: अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठच्या बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे: अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. साडेतीन मुहूतार्पैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. 

सनई व मंगलाष्टकांचे मंगल स्वर... लग्नसोहळ्यासाठी सजलेला मंडप आणि मंगलमूर्तीच्या भोवती केलेली आंब्यांची आरास... अशा वातावरणात अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यासोबतच श्री गणेश आणि देवी शारदा यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गाणपत्य सांप्रदायातील परंपरेनुसार विवाहसोहळ्याचे आयोजन देखील केले जाते. 
 
सकाळी  ११ वाजून ०९ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम् सोहळा थाटात पार पडला. सभामंडपात लग्नसोहळ्यातील सर्व धार्मिक विधींसह मंगलाष्टके देखील झाली. मंदिरात बुधवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायिका वेदश्री खाडिलकर - ओक  यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ वाजता गणेशयाग झाला. रात्री अखिल भारतीय महिला वारकरी मंडळाच्यावतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले होते. 

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, श्री गणेशांच्या दोन शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने आळविले जाते. भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता, आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात. शरद ऋतू मधील प्रसन्नतेप्रमाणे देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असे म्हणतात. अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशांसोबतच्या महामीलनाचा सोहळा म्हणजे श्री शारदेश मंगलम आहे. तसेच आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे.

Web Title: Mahanaivedi of 11,000 mangoes offered to Dagdusheth's Bappa on the occasion of Akshaya Tritiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.