Mahakumbh 2025 : ८० हजारांहून अधिक भाविक रेल्वेने गेले प्रयागराजला; रेल्वे विभागाला ८ कोटींहून अधिक महसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:18 IST2025-02-11T11:18:14+5:302025-02-11T11:18:34+5:30
माघी पौर्णिमा १२ फेब्रुवारीला असल्याने देशभरातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत

Mahakumbh 2025 : ८० हजारांहून अधिक भाविक रेल्वेने गेले प्रयागराजला; रेल्वे विभागाला ८ कोटींहून अधिक महसूल
- अंबादास गवंडी
पुणे : महाकुंभ मेळ्यानिमित्त देशभरातून भाविक प्रयागराजला जात आहेत. यामुळे रेल्वेला प्रचंड गर्दी आहे. जानेवारी महिन्यात पुणे विभागातून ८० हजार १७७ भाविक प्रयागराज येथे गेले असून, त्यातून रेल्वेच्या पुणे विभागाला ८ कोटी ४२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे, अशी माहिती पुणे विभागाचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर राजेशकुमार वर्मा आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
माघी पौर्णिमा १२ फेब्रुवारीला असल्याने देशभरातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पुणे विभागाचे डीआरएम राजेशकुमार वर्मा म्हणाले, महाकुंभ मेळ्यात सहभागी होता यावे आणि अमृत स्थानाचा आनंद घेता यावा याकरिता पुणे विभागातून दररोज १, आठवड्याला ५ आणि स्पेशल १ अशा रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. यामुळे पुण्यातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे.
महाकुंभ मेळ्यासाठी पुणे विभागातून ८० हजार १७७ प्रवासी रेल्वेने प्रयागराज येथे गेले. यात्रेकरूंच्या सुविधेसाठी फाफा माऊ, नैनी, प्रयागराज, प्रयागराज संगम, सुभेदार गंज, प्रभागराज चुंकी, प्रयागराज रामबाग, ज्युसी या आठ रेल्वे स्थानकांवरही सेवासुविधांची चोख व्यवस्था केली आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. पुणे विभागातून आतापर्यंत ५ स्पेशल ट्रेन प्रयागराज येथे रवाना करण्यात आल्या आहेत. २१ फेब्रुवारीला देखील स्पेशल ट्रेन प्रयागराज येथे सोडण्यात येणार आहे. आयआरटीसी मार्फत प्रयागराज येथे यात्रेकरूंसाठी टेंटची व्यवस्था केली आहे, असे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सांगितले.