पुण्यात भरधाव कारचा भीषण अपघात; दोन्ही पाय अडकलेल्या अल्पवयीन चालकाची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 14:46 IST2021-11-17T14:32:25+5:302021-11-17T14:46:53+5:30
याबाबत अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, एक आलिशान गाडीतून दोन १७ वर्षाची मुले पहाटे अडीच वाजता वेगाने डी पी रोडवरुन म्हात्रे पुलाकडे येत होते. वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून तिने दुभाजकाला धडक दिली.

पुण्यात भरधाव कारचा भीषण अपघात; दोन्ही पाय अडकलेल्या अल्पवयीन चालकाची सुटका
पुणे : भरधाव जाणाऱ्या आलिशान बीएमडब्लू कारने पहाटेच्या सुमारास म्हात्रे पुलाजवळील डी. पी. रोडवरील दुभाजकाला धडक दिली. आलिशान गाडीतील सोयीमुळे वेळीच त्यातील एअरबॅग उघडून चालक व त्याच्या शेजारी बसलेल्यांचे प्राण वाचले. मात्र, ही धडक इतकी जोरात होती की, या गाडीचे संपूर्ण इंजिन आत घुसल्याने त्यात अल्पवयीन चालकाचे पाय अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीचा पुढचा भाग कापून या मुलाची सुटका केली. या गाडीतील दोन्ही १७ वर्षाच्या मुलांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, एक आलिशान गाडीतून दोन १७ वर्षाची मुले पहाटे अडीच वाजता वेगाने डी पी रोडवरुन म्हात्रे पुलाकडे येत होते. वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून तिने दुभाजकाला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, या आलिशान गाडीचे इंजिन आत एअरबॅगमुळे गाडीतील दोघांचे प्राण वाचले. पण चालक युवकाचे दोन्ही पाय अडकले होते.
अग्निशमन दलाला याची खबर पहाटे अडीच वाजता मिळाल्यावर एरंडवणा फायर स्टेशनची गाडी रवाना झाली. तसेच मुख्य केंद्रातून रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी पोहचली. अग्निशमन दलाचे अधिकारी जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेडर व कटरच्या सहाय्याने गाडीच्या इंजिनाने पार्ट कापून काढले. गाडीचा पुढचा भाग मागे ओढून तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी या अल्पवयीन चालकाची सुटका केली.
याबाबत अग्निशमन दलाचे मंगेश मिलावणे यांनी सांगितले की, गाडीने दुभाजकाला इतकी जोरात धडक दिली होती की, चालकाच्या बाजूची संपूर्ण साईट आत घुसली होती. चाक निखळले होते. कटरने गाडीच्या इंजिनाचा भाग कापून तसेच पुढचा भाग ओढून काढल्यावर मुलाची सुटका करण्यात यश आले.