भीमसैनिकाची एकनिष्ठ मानवंदना! विजयस्तंभ अभिवादनासाठी २ हजार किलोमीटर सायकल प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 03:02 PM2023-01-01T15:02:39+5:302023-01-01T15:02:48+5:30
उत्तर प्रदेशमधील युवक झाला कोरेगाव भीमात दाखल
कोरेगाव भीमा: येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करून मानवंदना देण्यासाठी १ जानेवारी या शौर्यदिनी लाखो भीम सैनिक येत असून येथे गेल्या काही दिवसांपासून भीमसैनिक दाखल होण्यास सुरुवात झालेली असताना चक्क उत्तर प्रदेश येथून ‘जात तोडो, समाज जोडो’ हा संदेश देण्यासाठी भीमा भारती हा भीम सैनिक तब्बल चक्क २ हजार १०० किलोमीटर सायकल प्रवास करून मानवंदना देण्यासाठी दाखल झाला आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथील जयस्तंभ अभिवादन सोहळ्याला मानवंदना देण्यासाठी नुकतेच ४ डिसेंबर २०२२ रोजी उत्तर प्रदेश राज्यातून ‘जात तोडो, समाज जोडो’ हा संदेश घेऊन भीमा भारती या भीम सैनिकाने सायकलवरून तब्बल २ हजार १०० किलोमीटर प्रवास केला. या प्रवासादरम्यान नागपूर येथील दीक्षाभूमीवर नतमस्तक झाल्यानंतर आज ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास भीमा भारती हा जयस्तंभला अभिवादन करण्यासाठी दाखल झाला असून त्याचे धम्म भंते यांनी स्वागत केले.
भीमा भारती या युवकाने उत्तरप्रदेश आग्रा, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, कोरेगाव भीमा असा प्रवास करत जयस्तंभ येथे हजेरी लावली आहे. या भीमसैनिकाने जाती अंतासाठी आपला लढा उभारला असून यासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे. भीमा भारतीने उत्तरप्रदेश ते कोरेगाव भीमा सायकलवर प्रवास करत जाती अंत होऊन समाज जोडला जावा या विचाराच्या समर्थनार्थ जाती तोडो समाज जोडो हा संदेश जनतेला देण्यासाठी विशेष असे परिश्रम घेतल्याच्या त्याच्या कृतीतून दिसून येत आहे.