पुणे : एकमेकांवर असलेल्या प्रेमामुळे दोघे फिरायला जायचे. पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. अचानक जातीमुळे घरातील मंडळी त्यांचे लग्न होऊ देणार नाही. त्यामुळे आजपासून आपण एकमेकांशी बोलायचे नाही अथवा भेटायचे देखील नाही असा निरोप त्याने तिला दिला. तिने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने बघून घेण्याची धमकी देत तिला अपमानित केले. यामुळे आलेल्या नैराश्यातून १७ वर्षीय युवतीने २३ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आता फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा १७ वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती १७ वर्षांची असून ती दुसऱ्या जातीची असल्याचे माहिती असूनही युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यानंतर आता त्याने ती दुसऱ्या जातीची असल्याने घरातील लोक लग्न होऊ देणार नाहीत. त्यामुळे आजपासून एकमेकांशी बोलायचे नाही, किंवा भेटायचे नाही. कसलाही संबंध ठेवायचा नाही, जे होते ते सर्व संपले असे समज, असा निरोप त्याने या युवतीला दिला. तेव्हा तिने त्याच्याशी संपर्क केला. त्यावेळी त्याने तिला जातीवाचक शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी देऊन अपमानित केले. त्यामुळे आलेल्या नैराश्येतून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले करत आहेत.