दुप्पट पैसे मिळवण्याच्या आमिषाला भुलले अन् ५० लाख गमावले...
By भाग्यश्री गिलडा | Updated: June 2, 2023 17:54 IST2023-06-02T17:54:40+5:302023-06-02T17:54:48+5:30
दुप्पट मोबदला मिळवून देतो असे सांगून ५९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कल्याणीनगर येथे घडला

दुप्पट पैसे मिळवण्याच्या आमिषाला भुलले अन् ५० लाख गमावले...
पुणे : दुप्पट मोबदला मिळवून देतो असे सांगून ५९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कल्याणीनगर येथे घडला आहे. याप्रकरणी आरोपी गिरीश विजय कोल्हे (रा. वाघोली) यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय विलासराव देशमुख (वय ४१, रा. वडगाव शेरी) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरुवातीला आरोपी कोल्हे याने देशमुख यांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर एका कंपनीचे नाव सांगत, या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करा. गुंतवणूक केलेल्या पैश्यांचा दुप्पट मोबदला मिळवून देतो असे सांगितले. त्यांनतर देशमुख यांनी कोल्हे याच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये एकूण ५९ लाख ५० हजार रुपये जमा केले. जमा केलेल्या रकमेपैकी ९ लाख रुपयेच परत मिळाले. बाकीचे पैसे कधी मिळणार याची विचारणा करण्यासाठी संपर्क केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे देशमुख यांच्या लक्षात येताच तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब नोंदवला. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या पुढील तपास करत आहेत.