Pune Crime: शिवाजीनगर भागात कोयत्याच्या धाक दाखवून लूटमार, आरोपींच्या मुसक्या आवळल्या
By नितीश गोवंडे | Updated: February 21, 2024 15:43 IST2024-02-21T15:42:21+5:302024-02-21T15:43:24+5:30
दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत...

Pune Crime: शिवाजीनगर भागात कोयत्याच्या धाक दाखवून लूटमार, आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पुणे : शिवाजीनगर भागात पादचाऱ्याला कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत.
चंदु नंदू सरोदे (१९) आणि सिद्धेश विश्वास शेंडगे (१८, दोघे रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शिवाजीनगर भागातून पहाटे निघालेल्या पादचाऱ्याला अडवून सरोदे, शेंडगे आणि अल्पवयीन साथीदारांनी कोयत्याचा धाक दाखवला होता. पादचाऱ्याकडील मोबाइल चोरून ते पसार झाले होते. पोलिसांनी पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली.
सीसीटीव्ही तसेच तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार सराेदे आणि शेंडगे यांना सापळा लावून महापालिका भवन परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित बडे, अविनाश भिवरे, राजकिरण पवार, रुपेश वाघमारे, सुदाम तायडे यांच्या पथकाने केली.