'अधिक काळ सत्ता असली की माज येतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 02:39 AM2018-11-03T02:39:26+5:302018-11-03T06:54:54+5:30

संजय नहार यांना रामकृष्ण मोरे जीवनगौैरव पुरस्कार

'For a long time the power comes in the light' | 'अधिक काळ सत्ता असली की माज येतो'

'अधिक काळ सत्ता असली की माज येतो'

पुणे : ‘भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची देशाला गरज आहे. पक्षांमध्ये चांगले कार्यकर्ते असणे महत्त्वाचे असते. कोणत्याही एका पक्षाला जास्त वेळ सत्ता मिळाली की माज येतो. लोकशाही कायम टिकवून ठेवायची असेल तर दोन्ही पक्ष सशक्त होण्याची गरज आहे. कोणत्याही पक्षाला मंदिर, पुतळे बांधणाऱ्या नेत्यांची नव्हे, तर प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर मार्मिक टिप्पणी केली. दाखल्यावरची जात जात नाही, तोवर जाती निर्मूलनाकडे जाता येणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानच्या वतीने माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या नावाने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना प्रदान करण्यात आला. सूर्यकांत पलांडे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. गजानन एकबोटे, रामदास फुटाणे, मोहन जोशी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

फुटाणे म्हणाले, ‘प्रत्येक पक्षात तीन प्रकारचे नेते असतात. रामकाटी बाभळ म्हणजे त्यांचा संबंध थेट हाय कमांडशी असतो. सुबाभळ वर्गातील नेते कालपर्यंत कुठेच नसतात. अचानक अनुभवी नेत्यांपेक्षा त्यांना जास्त महत्त्व प्राप्त होते. तिसरा वर्ग म्हणजे येडी बाभळ अर्थात सामान्य कार्यकर्ते असतात. कोणताही राजकीय पक्ष त्यांच्यावरच उभा असतो. आता पक्षांमधील येडी बाभळ कमी झाली असून भक्तांची संख्या वाढली आहे. भक्तांमुळे पक्ष संकटात येतो. अभिनंदन थोरात यांनी प्रास्ताविक केले. संजय बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

माणसांचे महामंडळ काढण्याची गरज
समाजात धर्मांधता वाढली आहे, याचा फायदा राजकीय पक्ष घेत आहेत. काँग्रेसने प्रत्येक जातीचे महामंडळ काढून जातीयतेला थारा दिला. भाजपाही सर्व जातीतील नेत्यांना मंत्रिपदे देऊन तोच कित्ता गिरवत आहेत. त्यापेक्षा माणसांचे महामंडळ काढण्याची गरज आहे, असे फुटाणे म्हणाले. नहार म्हणाले, ‘इतिहासात सगळ्या प्रशांची उत्तरे लपलेली आहेत. आपण उत्तरे शोधण्याऐवजी प्रश्न घेऊन पुढे जात आहोत. तो समाज सोयीस्करपणे उत्तरे विसरून प्रश्नांना चिकटून राहतो, त्या समाजाचे अस्तित्व धोक्यात येते.’

Web Title: 'For a long time the power comes in the light'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.