लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २९ मार्चला; संगीत क्षेत्रातील असामान्य गुणवत्तेचा सन्मान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:42 IST2025-03-24T15:41:17+5:302025-03-24T15:42:01+5:30
यंदाचा आयकॉन म्युझिक अवॉर्ड पुरस्कार प्रसिद्ध तबलावादक पंडित विजय घाटे आणि लिजेंड गायक पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना देण्यात येणार

लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २९ मार्चला; संगीत क्षेत्रातील असामान्य गुणवत्तेचा सन्मान!
पुणे : 'लोकमत सखी मंच'च्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त 'लोकमत समूहा'च्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘संगीत क्षेत्रातील असामान्य गुणवत्तेचा गौरव करणारा ‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२५’ या सोहळ्याचे आयोजन शनिवारी, दि. २९ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजता कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे.
हा सन्मान सोहळा यंदा १२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. संगीत हा ज्यांचा श्वास होता अशा स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत वृत्तपत्र समूहाने निर्मिलेले हे व्यासपीठ गायन-वादनाच्या क्षेत्रातील तरुण आगमनाची पहिली ललकारी देणारे ठरत आहे. मागील दशकभरात अनेक तरुण कलाकारांच्या पाठीवर 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा'ची थाप पडली आहे.
पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. राजन-साजन मिश्रा, एल. सुब्रमण्यन, पं. हृदयनाथ मंगेशकर, शुभा मुदगल, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, पंकज उधास, आदी मान्यवर सूर ज्योत्स्ना पुरस्काराचे मानकरी ठरले असून, यंदाचा आयकॉन म्युझिक अवॉर्ड पुरस्कार प्रसिद्ध तबलावादक पंडित विजय घाटे आणि लिजेंड गायक पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना देण्यात येणार आहे.
यंदाच्या सोहळ्यात ‘सूर ज्योत्स्ना बँड’ या विशेष संगीत कार्यक्रमाद्वारे युवा कलाकार आपली प्रतिभा सादर करणार आहेत. या कार्यक्रमात आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, हरगून कौर, मेहताब अली, एस. आकाश, रमाकांत गायकवाड आणि शिखरनाद कुरेशी आपल्या सुरेल गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. याशिवाय यशवंत वैष्णव, ओमकार इंगवले, अनय गाडगीळ आणि मंदार गोडसे हे कुशल संगीतकार वाद्यवृंदाची साथ-संगत करतील. कार्यक्रमाची प्रस्तुती ‘लोकमत’ची असून, ज्योत्स्ना बँडमधील अनेक विजेते कलाकाराचे सादरीकरण या कार्यक्रमामधून होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमकार दीक्षित करतील. संगीत रसिकांसाठी हा एक अविस्मरणीय सोहळा ठरणार असून, या शानदार संगीतमय अनुभवाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तिन्ही घराण्यांचा कलात्मक संगम घडवून आणणारे पं. उल्हास कशाळकर
वडिलांकडून मिळालेल्या संगीतविद्येचा निगुतीने केलेला अभ्यास आणि त्यावर आपल्या स्वतंत्र प्रतिभेने आणि सततच्या मेहनतीतून केलेला संस्कार, यातून ज्यांची संपन्न गायकी घडली, असे अभिजात भारतीय संगीत परंपरेतील एक रूपेरी नाव म्हणजे पं. उल्हास कशाळकर. भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात उल्हास कशाळकर हे नाव सर्वश्रुत झाले आहे, याचे कारण त्यांची सातत्यपूर्ण कारकीर्द. संगीतातील आद्यपणाचा मान मिळालेल्या ग्वाल्हेर घराण्याबरोबरच जयपूर आणि आग्रा या तळपणाऱ्या घराण्यांचीही तालीम उल्हासजींना मिळाली.
तालवाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविणारे पंडित विजय घाटे
भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात गायनाला साथसंगतीचे वाद्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'तबला' या तालवाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्यात पुण्यातील पं. विजय घाटे यांचे मोलाचे योगदान आहे. सर्जनात्मकता, कल्पकता आणि अचूकता या वादनांच्या वैशिष्ट्यांसह सादरीकरणाच्या अनोख्या शैलीमुळे युवापिढीच्या पसंतीस पं. घाटे उतरलेले आहेत. उस्ताद बिस्मिल्लाह खाँ, उस्ताद विलायत खाँ, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित बिरजू महाराज, पंडित जसराज, उस्ताद शाहिद परवेझ आणि अनेक मान्यवर कलाकारांच्या सोबत साथ केली आहे.