२४ तासांपासून लोहगाव परिसर अंधारात : महावितरणच्या दिरंगाईमुळे नागरिकांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 15:52 IST2019-06-25T15:47:50+5:302019-06-25T15:52:17+5:30
वीजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे लोहगाव परिसरातील काही भागातील वीज पुरवठा सोमवारी दुपारी 3 वाजता खंडीत झाला. महावितरणच्या कर्मचा-यांकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे

२४ तासांपासून लोहगाव परिसर अंधारात : महावितरणच्या दिरंगाईमुळे नागरिकांना मनस्ताप
पुणे: वीजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे लोहगाव परिसरातील काही भागातील वीज पुरवठा सोमवारी दुपारी 3 वाजता खंडीत झाला. महावितरणच्या कर्मचा-यांकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र,तब्बल 24 तास उलटून गेल्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या कर्मचा-यांना यश आले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मान्सूनच्या आगमानंतरच्या पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला.
पावसाने उघडीप दिल्यानंतर महावितरणकडून काही भागातील वीज पुरवठा सुरूळीत करण्यात आला. मात्र,लोहगाव परिसरातील कर्मभूमी,पवार वस्ती, दादाची पडळ, वॉटर पार्क परिसरातील वीज पुरवठा सलग 24 तासापासून बंद आहे. वीज नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कर्मभूमी जवळ जमिनीखालील वीज वाहिनीत बिघाड झाला असून मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल, असे महावितरणच्या विश्रांतवाडी कार्यालयाच्या अधिका-यांनी सांगितले. परतु,दुपारी तीन वाजून गेल्यानंतरही या परिसरातील वीज पुरवठा सुरू झाला नाही.
जमीनीखालील नादुरूस्त झालेली वीज वाहिनी शोधण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा बंद होता.कर्मभूमी परिसरात वीज वाहिनी दुरूस्तीचे काम सुरू आहे. लवकरच या परिसरातील वीज पुरवठा सुरू होईल,असे महावितरण कार्यालयाच्या नगर रस्त्यावरील वरिष्ठ अधिका-यांकडून सांगितले जात आहे.