अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हा दृष्टीकोन असेल तर..; शरद पवारांचा महायुतीच्या नेत्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:51 IST2025-11-28T11:49:14+5:302025-11-28T11:51:30+5:30
अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टीकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे.

अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हा दृष्टीकोन असेल तर..; शरद पवारांचा महायुतीच्या नेत्यांना टोला
बारामती : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने महायुतीच्या नेत्यांमध्ये मते मागताना निधी देण्यासाठी जी काही चढाओढ चालली आहे.. पैसे घे.. निधी घे.. हे काही चांगलं नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टीकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे.
ज्येष्ठ नेते पवार हे गुरुवारी (दि. २७) बारामती दाैऱ्यावर होते. यावेळी गोविंदबाग निवासस्थानी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाने कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत ज्येष्ठ नेते पवार म्हणाले, हा वसुली थांबविण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी पडेल. पण, त्याची गरज भागणार नाही. मला असं वाटतं, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान पाहिल्यानंतर त्या शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत द्यायला हवी होती, काही रकमेसाठी व्याज माफ करून हफ्ते करून दिले असते तर शेतकऱ्यांना अधिक मदत झाली असती, आज पुरेशी आहे, असं मला वाटत नाही, असे पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विविध भागात वेगवेगळे पक्ष एकत्र येत निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांवर पवार म्हणाले, खरं सांगायचं झालं तर या स्थानिक निवडणुका असतात.
यापूर्वी देशातील बऱ्याचशा नेत्यांनी या स्थानिक निवडणुकांमध्ये राजकारण न आणण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे मला पहिल्यांदा असं दिसतंय, यंदा या निवडणुकीत ठिकठिकाणी गट पडल्याचे दिसून येते. तोच एक गट दुसऱ्या पक्षाबरोबर निवडणुका लढवत आहे. यामध्ये एकवाक्यता नाही, असा स्वच्छ अर्थ निघतो. मात्र, लोकांना हवा तो योग्य निकाल मतदार देतील. त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याचं कारण नाही. माझ्यासारखे लोक यापूर्वी कधीही अशा निवडणुकांमध्ये पडत नव्हतो. आता दोन-चार दिवस राहिले आहेत, काय होते ते बघू या, असे पवार म्हणाले.