महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:34 IST2025-12-16T08:35:27+5:302025-12-16T10:34:41+5:30
कुणीही एकत्र आले, वेगळे लढले तरी जनतेच्या मनात जे असते ते घडत असते. जनता जर्नादन सर्वस्व आहे असं अजित पवारांनी सांगितले.

महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
पुणे - राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुण्यात महायुतीत फूट पडल्याचं चित्र आहे. पुण्यात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दोघांची ताकद आहे. त्याठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी आमनेसामने लढतील. ही मैत्रीपूर्ण लढत होईल असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात महायुती तुटल्याचंही घोषणा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावणार असं आव्हान दिले आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी हे विधान केले म्हणजे ते चर्चेनंतरच केले असेल. आम्ही अनेकदा एकत्र बसलो, चर्चा करतो त्यानंतर फडणवीसांनी ते विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक विधान केले असेल. २५ वर्ष मी महापालिका सांभाळली आहे. शहरांचा सर्वांगीण विकास कसा केला हे लोकांनी पाहिले आहे. परंतु दुर्दैवाने २०१७ साली माझ्याकडचे बरेच जण बाजूला गेले आणि तिथे भाजपाची सत्ता आली. आम्ही महाविकास आघाडी होतो, तिथे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार होते. त्यामुळे स्थानिक विचार करून पुढचे निर्णय घेतले जातील असं त्यांनी सांगितले.
तसेच कुणीही एकत्र आले, वेगळे लढले तरी जनतेच्या मनात जे असते ते घडत असते. जनता जर्नादन सर्वस्व आहे. कुणाला निवडून आणायचे हे लोक ठरवतात. निवडून एखादा पक्ष आला तर ते ईव्हीएम चांगले आहे असं बोलतात. पराभूत झाल्यावर ईव्हीएमवर दोष द्यायचा हे बरोबर नाही. लोकसभेला आमच्या ३१ जागा पराभूत झाल्या अवघ्या १७ जागा आल्या तेव्हा विरोधकांना ईव्हीएम चांगले वाटले. आम्ही ईव्हीएमबाबत काही बोललो नाही. तो जनतेचा कौल होता. मात्र लाडकी बहीण, शेतकरी योजनेने ५ महिन्यात निकालात बदल झाला तर लगेच ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. काही काही ठिकाणी दुबार नावे, तिबार नावे यावर सगळ्यांनी आक्षेप घेतला. ज्यावेळी मतदार यादीत हे घोळ होतात तेव्हा यादी बनवणाऱ्याने पारदर्शकता आणली पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
पुण्यात भाजपाने ५ वर्ष चांगला विकास केला आहे. आमचा जनतेवर विश्वास आहे. त्यामुळे जनता आम्हाला पुन्हा संधी देईल. मात्र पुण्याबाबत अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजप हे समोरसमोर लढतील. पण ती लढत मैत्रीपूर्ण असेल. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.